११ महिन्यानंतर कामाला मुहूर्त

By Admin | Updated: January 31, 2015 00:21 IST2015-01-31T00:21:08+5:302015-01-31T00:21:08+5:30

येथून जवळच असलेल्या दहेगाव गावाची नाल्यावर नसलेला पूल ही मुख्य समस्या होती. या समस्येचे गांभीर्य ओळखून तत्कालीन आमदारांनी पुलाच्या कामाचे भूूमिपूजन केले होते.

After 11 months, work begins | ११ महिन्यानंतर कामाला मुहूर्त

११ महिन्यानंतर कामाला मुहूर्त

घोन्सा : येथून जवळच असलेल्या दहेगाव गावाची नाल्यावर नसलेला पूल ही मुख्य समस्या होती. या समस्येचे गांभीर्य ओळखून तत्कालीन आमदारांनी पुलाच्या कामाचे भूूमिपूजन केले होते. मात्र या पुलााच्या कामाला आत्तापर्यंत मुहूर्तच सापडत नव्हता. अखेर तब्बल ११ महिन्यानंतर एकदाचा या पुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडला आहे.
दहेगाव येथील मुख्य मार्गावर असलेल्या नाल्यावर अद्याप पूल नाही. या नाल्यावर पूल बांधण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी वारंवार संबधित विभाग आणि लोकप्रतिनिधींना निवेदने दिली होती. त्याचा सतत पाठपुरावाही करण्यात आला. तथापि प्रत्येक राजकीय पक्षांनी या समस्येचा लाभ घेत केवळ आपली पोळी शेकून घेतली आणि समस्या ‘जैसे थे’च राहिली. परिणामी ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती. लोकप्रतिनिधींविषयी त्यांच्या मनात आक्रोष निर्माण झाला होता. आश्वासनांची त्यांना सवय झाली होती.
यानंतर लोकसभा निवडणूक घोषित होण्यापूर्वी तत्कालीन आमदार वामनराव कासावार यांनी गेल्या फेब्रुवारी महिन्यातच या पुलाच्या बांधकामाचे कामाचे भूमिपूजन केले होते. त्यासाठी जवळपास ३० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. तथापि प्रत्यक्षात पुलाच्या बांधकामाला सुरूवात झाली नव्हती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने हे काम खोळंबले होते. त्यानंतर विधानसभा निवडणूक आली. त्यामुळे पुन्हा आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागण्यापूर्वी पुलाचे बांधकाम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र तसे झालेच नाही. विधानसभा निवडणूक आटोपल्यांतरही पुलाच्या भूमिपूजनाचे प्रत्यक्ष कामात रूपांतर झालेच नाही.
पुलाचे बांधकाम सुरू होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. आता तब्बल ११ महिन्यानंतर या कामाला मुहूर्त सापडला आहे. नुकतेच या पुलाचे बांधकाम सुरू झाल्याचे दिसत आहे. या नाल्यावर पूल नसल्याने दहेगाववासीयांची मोठी पंचाईत होते. पावसाळ्यातील चार महिने या नाल्यावरून मार्गक्रमण करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. पावसाळ्यात या नाल्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. त्यावेळी या गावाचा संपर्क तुटतो. पुलावरून पाणी वाहात असल्यास बाहेरगावी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर ओसरेपर्यंत वाट बघावी लागते. त्यांना घरीच राहावे लागते. पावसाळ्यात या गावातील एखाद्याची प्रकृती बिघडली, तरी नाल्यावरील पूर ओसरण्याची वाट बघावी लागते. त्यामुळे रूग्णाचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. गावकऱ्यांच्या दृष्टीने पूल नसणे ही मोठी समस्या होती. या पुलाच्या कामाविषयी अधिकारी व कंत्राटदारांना माहिती विचारली असता त्यांनी काही तांत्रिक अडचण व गावातील समस्या अशीच कारणे सांगून हे काम आजपर्यंत पुढे ढकलले होते. आता पुलाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर)

Web Title: After 11 months, work begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.