प्रतिज्ञापत्राला पर्याय स्वघोषणापत्राची घोषणा हवेतच
By Admin | Updated: November 30, 2014 23:14 IST2014-11-30T23:14:01+5:302014-11-30T23:14:01+5:30
विविध प्रमाणपत्र आणि दाखल्यांसाठी नागरिकांना सेतू सुविधा केंद्रांवर सादर कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रामुळे नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे शासनाने एका निर्णयानुसार

प्रतिज्ञापत्राला पर्याय स्वघोषणापत्राची घोषणा हवेतच
गजानन अक्कलवार - कळंब
विविध प्रमाणपत्र आणि दाखल्यांसाठी नागरिकांना सेतू सुविधा केंद्रांवर सादर कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रामुळे नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे शासनाने एका निर्णयानुसार प्रतिज्ञापत्राऐवजी केवळ स्वघोषणापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. परंतु शासनाच्या या आदेशाकडे सर्वच ठिकाणी डोळेझाक केली जात आहे. महा-ईसेवा केंद्र तसेच सेतू सुविधा केंद्रात आजही प्रतिज्ञापत्रच भरुन घेतले जात आहे.
विविध सेवा, सुविधा आणि दाखले मिळविण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. यासाठी स्टॅम्प पेपर, तिकिटा लावाव्या लागत होत्या. अर्जनविसालाही लिखाणासाठी पैसे द्यावे लागत होते. तसेच अशिक्षित व्यक्तीला तर मोठा त्रास सहन करावा लागत होता. प्रतिज्ञापत्रावर तहसीलदारांची स्वाक्षरी मिळविण्यासाठी तासन्तास ताटकळत रहावे लागते. या कामासाठी संपूर्ण दिवसही खर्ची जात होता. त्यामुळेच शासनाने यावर मार्ग काढीत स्वघोषणा पत्र सादर करण्याचा आदेश निर्गमित केला. दरम्यानच्या काळात सुशिक्षित व्यक्तींनी स्वघोषणापत्राचा उपयोग केला. स्वघोषणापत्र अर्जाचाच एक भाग म्हणून विचारात घेतले जाणार आहे. तसे जाहीरही करण्यात आले होते. साध्या कागदावर स्वघोषणापत्र सादर करता येईल. यासाठी कुठल्याही न्यायिक कागदाची आवश्यकता राहणार नसल्याचे शासकीय आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार होता. परंतु सध्या स्वघोषणापत्राची अंमलबजावणीच होत नाही. जुन्या पद्धतीनेच प्रतिज्ञापत्र भरुन घेतले जात आहे.
प्रतिज्ञापत्र नागरिक स्वेच्छापूर्वक व कायद्याचे भान ठेऊन सादर केले जाते. असे असले तरी सक्षम प्राधिकाऱ्यासमक्षच ते करावे लागते. त्यामुळे अर्जदाराला अनेकदा मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो. परंतु स्वघोषणापत्र सादर करताना नागरिकांचा त्रास, वेळ आणि पैशाची बचत होणार होती. महा-ईसेवा केंद्र, सेतू केंद्र, ई-डिस्ट्रीक्ट इत्यादी प्रकल्पांतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधा, दाखले, प्रमाणपत्रांसाठी स्वघोषणापत्र घेण्यात येईल, असे सांगण्यात आले मात्र उपयोग होत नाही.