वकिलांनी वस्तुस्थिती समजून बाजू मांडावी
By Admin | Updated: November 30, 2015 02:19 IST2015-11-30T02:19:00+5:302015-11-30T02:19:00+5:30
न्यायदानासाठी न्यायाधीश आणि वकील यांच्यामध्ये चांगला समन्वय आवश्यक आहे. दाखल होणारी प्रकरणे कायद्याच्या चौकटीत बसवून समजून घ्यावी.

वकिलांनी वस्तुस्थिती समजून बाजू मांडावी
रवी देशपांडे : आर्णी येथील न्यायालयाचे उद्घाटन
आर्णी : न्यायदानासाठी न्यायाधीश आणि वकील यांच्यामध्ये चांगला समन्वय आवश्यक आहे. दाखल होणारी प्रकरणे कायद्याच्या चौकटीत बसवून समजून घ्यावी. वकिलांनी प्रकरणे ठेवताना दिवाणी व फौजदारी कायद्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. हा अभ्यास प्रकरणाची मांडणी चांगल्याप्रकारे करण्यास फायदेशीर ठरतो. वस्तुस्थिती लक्षात घेऊन व्यवस्थित बाजू मांडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी केले.
आर्णी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन रविवारी न्या. देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप शिरासाव, आमदार ख्वाजा बेग, जिल्हा न्यायाधीश ए. टी. वानखडे, आर्णीचे दिवाणी न्यायाधीश ए. यू. बहीर, सहदिवाणी न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी, नगराध्यक्ष आरिज बेग, बांधकामचे अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के, आर्णी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. डी. डी. राठोड आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, न्यायालय न्याय आणि दानाचा संगम आहे. या ठिकाणी प्रत्येकास न्याय मिळणे आवश्यक आहे, ही भूमिका ठेऊन न्यायाधीश आणि वकिलांनी कार्य केले पाहिजे व आपले कर्तव्य बजावले पाहिजे.
न्यायदान करताना कायद्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे. न्यायाधीश मंडळींनी न्याय देत असताना नि:पक्ष, निर्भीडपणे हे काम केले पाहिजे. दोन्ही बाजू समजून घेऊन कायद्यातील तरतुदी पाहून कार्य करावे. यामुळे पक्षकारास आपल्यावर अन्याय झाल्याची भावना होणार नाही. आर्णी येथील नवीन न्यायमंदिरात वकील, न्यायाधीशांच्या समन्वयाने चांगले निर्णय लागतील, असे न्या. देशपांडे यांनी सांगितले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप शिरासाव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. आर्णी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या न्यायमंदीरात जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले. आर्णी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. डी. डी. राठोड यांनी प्रास्ताविक केले.
सुरूवातील फित कापून तसेच नामफलकाचे अनावरण करून मान्यवरांच्या हस्ते न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. इमारतीच्या उभारणीसाठी उत्कृष्ठ काम केल्याबद्दल बांधकामचे अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आर्णी वकील संघाच्यावतीने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही झाले.
सूत्रसंचालन न्या. योगिता तिवारी यांनी केले. तर आभार न्या. ए. यू. बहीर यांनी मानले. कार्यक्रमास न्यायाधीश, वकील मंडळी उपस्थित होती.
(तालुका प्रतिनिधी)