आघाडीतील कलहाचा फायदा
By Admin | Updated: May 17, 2014 23:55 IST2014-05-17T23:55:05+5:302014-05-17T23:55:05+5:30
यवतमाळ-वाशिम लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक मताधिक्य शिवसेनेने यवतमाळ विधानसभेत मिळविले आहे. ही विधानसभा काँग्रेसच्या वर्चस्वाखाली

आघाडीतील कलहाचा फायदा
यवतमाळ-वाशिम लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक मताधिक्य शिवसेनेने यवतमाळ विधानसभेत मिळविले आहे. ही विधानसभा काँग्रेसच्या वर्चस्वाखाली असून येथील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे जास्तीत जास्त सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहेत. त्यानंतरही शिवसेनेचा वारू रोखण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आले. या आघाडीतील पक्षांमध्ये अंतर्गत कलहाचा फायदा शिवसेना व भाजपने घेतला. जिल्ह्याचे ठिकाण असून येथील नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळविण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेससोबत फारकत घेतली आहे. त्यासाठी जिल्हा परिषद, नगरपरिषद शिवसेना-भाजपसोबत आघाडी करून सत्ता प्राप्त केली आहे. विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेसने वारंवार सत्ताधारी राष्ट्रवादीवर स्थानिक मुद्यांना घेवून चिखलफेक केली आहे. हा वाद स्थानिक पातळीवर थेट हाणामारीपर्यंतही पोहोचला होता. हा अंतर्गत दुरावा लोकसभेमध्येही कायम होता. त्यामुळे आमदार नंदिनी पारवेकर यांना आघाडीतील कार्यकर्ते एकत्र बसविण्यात सपसेल अपयश आले. यवतमाळ शहरासह लगतच्या ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसला अजूनही आपले संघटन उभारले नाही. या उलट शिवसेनेने लोकसभेपूर्वीच पक्षाची स्वतंत्र बांधणी सुरू केली होती. नव्या दमाची फौज येथे शिवसेनेजवळ होती. दुर्दैवाने तसा उत्साह निर्माण करणारा नवीन कार्यकर्ता काँग्रेस, राष्ट्रवादीजवळ दिसला नाही. शहर कार्यकारिणी नेत्यांनीच आपल्या प्रभावाखाली दडपून ठेवली. कधीच मोकळेपणाने त्यांना वावरू दिले नाही. या सर्व बाबी शिवसेनेच्या पथ्यावर पडत गेल्या. यात नरेंद्र मोदींच्या यवतमाळ भेटीने भाजप कार्यकर्त्यातही उत्साह संचारला. हा झांझावात शेवट निवडणुकीच्या शेवटच्या चरणात विधानसभेती ग्रामीण भागातही पसरला. तो थांबविण्यासाठी केवळ बैठका घेण्याशिवाय कोणताच पर्याय काँग्रेस आमदारापुढे राहिला नाही.