हंगामी वसतिगृहाच्या चौकशीसाठी चमू महागाव तालुक्यात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:25 IST2021-07-23T04:25:49+5:302021-07-23T04:25:49+5:30
महागाव : महागाव, पुसद, उमरखेड तालुक्यातील हंगामी वसतिगृहांच्या अनियमिततेचा पर्दाफाश ‘लोकमत’ने केल्यानंतर पंचायत समिती व जिल्हा परिषदेने चौकशी ...

हंगामी वसतिगृहाच्या चौकशीसाठी चमू महागाव तालुक्यात दाखल
महागाव : महागाव, पुसद, उमरखेड तालुक्यातील हंगामी वसतिगृहांच्या अनियमिततेचा पर्दाफाश ‘लोकमत’ने केल्यानंतर पंचायत समिती व जिल्हा परिषदेने चौकशी समिती नेमली आहे. गुरुवारी चौकशी समिती तालुक्यात दाखल झाली.
जिल्हास्तरावरील चौकशी समितीचे सदस्य गुरुवारी तालुक्यात दाखल झाले. त्यांनी तालुक्यातील हंगामी वसतिगृह चालवणाऱ्या शाळेला भेटी दिल्या. हंगामी वसतिगृहाच्या माध्यमातून झालेली आर्थिक अनियमितता शोधून काढण्यासाठी पंचायत समिती स्तरावर स्थापन झालेल्या चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वीच संबंधित हंगामी वसतिगृह चालवणाऱ्या काही मुख्याध्यापकांनी सभागृहाची सोशल मीडियावर बदनामी केली. यात संबंधितांची विभागीय चौकशी करण्याची मागणी पंचायत समिती सभापती अनिता चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेने चौकशी समिती नेमली आहे.
समितीचे प्रमुख घाटंजी येथील गटविकास अधिकारी आहे. त्यांच्या नेतृत्वात एक पथक गुरुवारी तालुक्यात दाखल झाले. कोरोनामुळे शाळेत विद्यार्थी नसतानाही वसतिगृह दाखवून महागाव, पुसद, उमरखेड या तीन तालुक्यांत ७० लाखांचा निधी उधळण्यात आला. ‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रार करण्यात आली. एप्रिलच्या मासिक सभेत पंचायत समिती सदस्य शिवाजीराव देशमुख- सवनेकर यांनी चौकशी समितीची मागणी केली होती. ‘लोकमत’ने प्रकरण उघडकीस आणल्यानंतर वसतिगृहांचे तीन लाखांचे देयक थांबवण्यात आले आहे.