प्रशासनही होतेय पारदर्शक
By Admin | Updated: December 1, 2014 23:02 IST2014-12-01T23:02:10+5:302014-12-01T23:02:10+5:30
केवळ शासकीय कार्यालयातच संगणकाचा वापर केला जातो, असे नाही, तर आता विविध कार्यालयात ‘ई’ प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे़ ग्रामपंचायतींमध्ये महा ई-सेवा संग्राम, महसूलमध्ये ई-सातबारा,

प्रशासनही होतेय पारदर्शक
कारभाराला गती : कर्मचाऱ्यांपुढे कागदी रिमऐवजी संगणक संच
नांदेपेरा : केवळ शासकीय कार्यालयातच संगणकाचा वापर केला जातो, असे नाही, तर आता विविध कार्यालयात ‘ई’ प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे़ ग्रामपंचायतींमध्ये महा ई-सेवा संग्राम, महसूलमध्ये ई-सातबारा, ई-फेरफार, भूमिअभिलेखमध्ये ई-मोजणी आदी संगणक प्रणालीचा वापर करण्यात येत आहे़ यामुळे वेळेचा अपव्यय कमी होण्यास मदत होत आहे़
तहसील, पंचायत समिती, आरोग्य विभागासह प्रमुख कार्यालये आता आॅनलाईन सेवा घेत आहे़ या सर्व कार्यालयांशी ‘कनेक्ट’ राहून आपला ‘डाटा अपडेट‘ करण्यासाठी अशा कार्यालयात ‘ब्रॉडबँड’ कनेक्शनचा वापर केला जात आहे़ पंचायत समितीमध्ये मग्रारोहयो, घरकुल आदींची माहिती, कृषी विभागातील अनुदान वितरण, सहकार विभागात डाटा अपडेट, भूमिअभिलेख विभागात मोजणी वेळापत्रक, शिक्षण विभागात वेतन देयके, आदी कामे आता आॅनलाईन होत असल्याने कारभारात पारदर्शकता व सुलभता येत आहे़
प्रत्येक गाव तालुका शहराशी कनेक्ट राहावे, ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी न येता गावातच विविध दाखले एका क्लिकवर मिळावे, याकरिता सर्व ग्रामपंचायतींना संगणक संच देण्यात आले आहे. त्यासाठी आॅपरेटरची नेमणूक करण्यात आली आहे. रहिवासी दाखला, जन्म-मृत्यू नोंदणी दाखला या विविध प्रकारच्या दाखल्याचे या ठिकाणावरून वितरण केले जात आहे़
शासकीय कामकाज करताना ‘पेपरलेस’ ही संकल्पना मार्गी लावण्यासाठी शासनाने संगणकाच्या वापरास चालना दिली आहे. परिणामी ग्रामपंचायत ते तहसील, पंचायत समिती आदी कार्यालये आॅनलाईन झाली आहेत़ संगणक प्रणालीचा वापर वाढल्याने गतीमान आणि पारदर्शक प्रशासन होण्यास हातभार लागत आहे़
शासकीय कार्यालयात प्रशासकीय कामकाज पार पाडताना यापूर्वी सर्रास वापरल्या जाणाऱ्या प्रचलित पध्दतीत सुधारणा करून हे कामकाज संगणकीय व आॅनलाईन पध्दतीने करण्यावर शासनाने भर दिला आहे. प्रचलित पध्दतीत कागदी घोडे नाचविताना कालमर्यादा सांभाळली जात नव्हती़ याशिवाय पारदर्शकतेचा अभावही दिसून येत होता़ यामुळेच ‘पेपरलेस’ संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कार्यालयात संगणकाचा वापर वाढत आहे़ तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांपुढे आता कागदी रिमऐवजी संगणक संचच दिसून येत आहे़ (वार्ताहर)