आदिवासीबहुल मोखाड विकासापासून कोसो दूर
By Admin | Updated: August 22, 2014 00:09 IST2014-08-22T00:09:19+5:302014-08-22T00:09:19+5:30
तालुक्यातील डोंगरकुशीत वसलेले छोटेसे आदिवासी गाव मोखाड स्वातंत्र्याच्या ६८ वर्षातही विकासापासून कोसो दूर आहे. ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत नळयोजनेचे निकृष्ट काम केल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

आदिवासीबहुल मोखाड विकासापासून कोसो दूर
पुसद : तालुक्यातील डोंगरकुशीत वसलेले छोटेसे आदिवासी गाव मोखाड स्वातंत्र्याच्या ६८ वर्षातही विकासापासून कोसो दूर आहे. ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत नळयोजनेचे निकृष्ट काम केल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. या गावात नागरी सुविधांचा अभाव असून, येथे अस्वच्छतेने कळस गाठला आहे. परिणामी गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या सर्व प्रकाराबाबत ग्राहक संरक्षण संस्थेने तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पुसद तालुक्यातील मोखाड अडीचशे घरांचे छोटेसे गाव आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या ६८ वर्षातही येथे विकास पोहोचला नाही. येथील सरपंच व सचिवांनी संगनमत करून शासनाच्या सर्व विकासात्मक योजना स्वत:च्याच घशात घातल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. गतवर्षी तयार करण्यात आलेला येथील सिमेंटचा रस्ता यंदा हरवला आहे. येथे सांडपाण्याच्या नाल्या नाहीेत. मात्र नालीसफाईच्या नावावर हजारो रुपयांची उचल केली आहे. ग्रामसभा येथे होतच नाही. तसेच गावातील सांडपाणी नाल्याअभावी येथील सार्वजनिक विहिरीत जात असल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते. या दूषित पाणी व घाणीच्या साम्राज्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कर वसूली मात्र शंभर टक्के असल्याचे गावकरी सांगतात. शासनाच्या ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत तब्बल १२ लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या नळयोजनेत येथील सरपंच व सचिवाने निकृष्ट दर्जाचे काम करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. या नळयोजनेपासून बरेचसे लोक वंचित असल्याची धक्कादायक माहिती पुढे अली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन योग्य चौकशी केल्यास येथील वास्तव बाहेर येईल, अशी येथील गावकऱ्यांना आशा आहे. (प्रतिनिधी)