उमरखेडमध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:12 IST2019-02-17T22:11:49+5:302019-02-17T22:12:23+5:30
येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय देण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या मागणीची दखल घेत रविवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस. चांदूरकर यांच्यासह जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी प्रस्तावित जागेची स्थळ पाहणी केली.

उमरखेडमध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय
दत्तात्रय देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय देण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या मागणीची दखल घेत रविवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस. चांदूरकर यांच्यासह जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी प्रस्तावित जागेची स्थळ पाहणी केली.
उमरखेड, महागाव येथील वकील संघटना आणि जवळपास ९० ग्रामपंचायतींसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी गेल्या दोन वर्षांपासून येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय निर्माण करण्याची मागणी लावून धरली आहे. वकील संघटनेने संयुक्तपणे या न्यायालयासाठी १७ एप्रिल २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका देखील दाखल केली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या खंडपीठात ही याचिका दाखल आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाचे यवतमाळ जिल्हा पालक न्यायमूर्ती ए.एस. चांदूरकर यांच्यासह जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेटकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, तहसीलदार भगवान कांबळे, वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. भूषण देवसरकर, उपाध्यक्ष अॅड. आय.वाय. सय्यद, सचिव राजेश सुरोशे, याचिकाकर्ते अॅड. निरंजन कदम आदींनी जागेची पाहणी केली.
पुसद रोडवरील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प सिंचन विभाग क्र. २ मध्ये संपूर्ण इमारतींची पाहणी आटोपल्यानंतर न्यायमूर्तींनी तहसील मागील नगरपरिषदेच्या भूखंडामधील सर्वे क्र. ३०२ मधील रिकाम्या जागेचीही पाहणी केली. शहरात उपलब्ध आणि रिकाम्या जागांची पाहणी केल्याने लवकरच उमरखेड येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रसंगी अॅड. अस्मिता टाकणखारे, अॅड. संजय जाधव, जितेंद्र पवार, मनोज काळेश्वरकर, उमेश तिवारी, शिवाजी वानखेडे, अॅड. शंकर मुनेश्वर, अॅड. भंडारी, तलाठी दत्तात्रय दुर्केवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम व सिंचन विभागाचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते.