सिंचन विहीर योजनेत खरे लाभार्थी वंचित
By Admin | Updated: March 2, 2016 02:48 IST2016-03-02T02:48:03+5:302016-03-02T02:48:03+5:30
सिंचन विहीर योजनेत प्रशासकीय यंत्रणेतील पारदर्शक तत्व हद्दपार झाल्याने या योजनेचा बोजवारा उडाला आहे.

सिंचन विहीर योजनेत खरे लाभार्थी वंचित
उद्देशाला तिलांजली : शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा
दिग्रस : सिंचन विहीर योजनेत प्रशासकीय यंत्रणेतील पारदर्शक तत्व हद्दपार झाल्याने या योजनेचा बोजवारा उडाला आहे. योजनेतील मोजक्याच लाभार्थ्यांच्या कामाची पाहणी करून अर्थपूर्ण संबंध जोपासून लाभ दिल्या जातो, तर बहुतेकांना वंचित ठेवले जाते. या योजनेत खऱ्या लभार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत डेहणी येथील नऊ शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
शेतसिंचनाच्या सुविधेतून शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी होण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन शासन दरबारातून विशेष अनुदानद्वारे धडक सिंचन योजना राबविली जाते. मात्र बहुतेक ठिकाणी भ्रष्ट कारभाराने योजनेच्या मुख्य उद्देशाला तिलांजली दिली जात आहे तर गावपातळीवरील ग्रामसभेतून योजनेचे खरे लाभार्थी निवड करणे क्रमप्राप्त असताना केवळ कागदोपत्री ग्रामसभेद्वारा निवड केल्याचा प्रकार समोर आलेला आहे.
याच कारणाने शेती नसताना व शासकीय सेवेतील कर्मचारी प्रतीक्षा यादीत चमकले. प्रतीक्षा निवड प्रक्रियेदरम्यान बोगस लाभार्थीचे नावे समोर आल्याने चकीत झालेले काही शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते डॉ. विष्णू उंकडे यांनी न्यायालयीन लढा देऊन स्थगिती मिळविली. वर्षभराच्या स्थगितीनंतरही योजनेमधील तथाकथीत गैरप्रकार सुरूच असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
२०११-१२ मधील डेहणी येथील धडक सिंचन योजनेअंतर्गत मोजक्याच लोकांना विहिरी देण्यात आल्या. या कामात खोदकाम व बांधकाम पाणी न करता बोगस लाभार्थ्यांना अनुदान राशी देण्यात आली पण खऱ्या लाभार्थ्यांनी अनुदान राशी मागणी केली असता त्यांना हेतुपुरस्सर डावलण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणीच चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी माणगी पंचायत समिती सदस्य अमोल मोरे, उपसरपंच जयवंत अनचेटवार यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
(शहर प्रतिनिधी)