म्हशीच्या नावाखाली लुटणारी टोळी सक्रिय
By Admin | Updated: March 14, 2015 02:22 IST2015-03-14T02:22:19+5:302015-03-14T02:22:19+5:30
अज्ञानाचा फायदा घेत गरिबांना म्हशी मिळवून देण्याच्या नावाखाली लुटणारी टोळी तालुक्यात सक्रिय झाली आहे.

म्हशीच्या नावाखाली लुटणारी टोळी सक्रिय
राळेगाव : अज्ञानाचा फायदा घेत गरिबांना म्हशी मिळवून देण्याच्या नावाखाली लुटणारी टोळी तालुक्यात सक्रिय झाली आहे. ग्रामीण भागात सुरू असलेल्या या प्रकारावर पशूसंवर्धन विभागानेही शिक्कामोर्तब केले आहे. या प्रकाराला कुणीही बळी पडू नये असे आवाहन सदर विभागाने केले आहे.
तालुक्यातील परसोडा, येवती, चिखली, वनोजा, खडकी आदी गावात काही तरुण शेतकरी वा इतरांच्या घरी जातात. राळेगाव पंचायत समितीच्या माध्यमातून आपणाला म्हैस दिली जाणार आहे, त्याकरिता १५ हजार रुपये भरावे लागतात, असे सांगून लुटले जात आहे. एखाद्याने पैसे कमी असल्याचे सांगितल्यास सध्या जेवढे आहे तेवढे द्या उर्वरित नंतर द्या असेही सांगून रक्कम उकळली जात आहे.
राळेगाव पंचायत समितीतून आम्ही आलो, असे मात्र ते आवर्जून सांगतात. ग्रामीण भागात एका घरी एक किंवा दोघांनी मिळून जाणारे हे व्यक्ती ३० वर्ष वयोगटातील आहे. ते मराठी भाषा उत्तम बोलतात. प्रवासासाठी ते दुचाकी वाहनांचा वापर करतात. पाच-सहा जण या टोळीत असल्याचे आढळून आले आहे. काही लोकांनी बुधवारी या संदर्भात पंचायत समितीत तक्रार दिली आहे.
ग्रामीण भागातील भोळ््या जनतेला फसवणारे हे टोळके कोण, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलीस आणि पंचायत विभागापुढे आहे. मराठी भाषा स्पष्टपणे बोलणारे हे तरुण परिसरातीलच असावे असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान, भोंदूगिरी करणाऱ्या भामट्यांना ग्रामस्थांनी पैसे देऊ नये. यासंदर्भात थेट पंचायत समिती किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशूसंवर्धन अधिकारी डॉ. सुहास अमृत यांनी केले आहे. योजनांच्या लाभासाठी थेट संपर्क करता येईल, असेही ते म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)