भाजी विक्रेत्यांवर कारवाई

By Admin | Updated: December 18, 2015 02:59 IST2015-12-18T02:59:21+5:302015-12-18T02:59:21+5:30

येथील वर्दळीच्या गांधी चौक ते डॉ. आंबेडकर चौकादरम्यान रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या भाजी विक्रेत्यांविरुद्ध गुरूवारी नगरपरिषदेने धडक मोहीम राबविली.

Action on Vegetable Sellers | भाजी विक्रेत्यांवर कारवाई

भाजी विक्रेत्यांवर कारवाई

पुसद नगरपरिषद : अनेक हातगाड्या जप्त, गुन्हे दाखल करणार
पुसद : येथील वर्दळीच्या गांधी चौक ते डॉ. आंबेडकर चौकादरम्यान रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या भाजी विक्रेत्यांविरुद्ध गुरूवारी नगरपरिषदेने धडक मोहीम राबविली. सूचना देऊनही तेथेच हातगाडी लावणाऱ्यांच्या अनेक हातगाड्या जप्त करण्यात आल्या. तर काही जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या कारवाईने भाजी विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
पुसद शहरातील महात्मा गांधी चौक, डॉ. आंबेडकर चौक, सुभाष चौक, मुखरे अमराई, महात्मा फुले चौक, शिवाजी चौक, नाईक चौक आदी परिसरात भाजी विक्रेते तसेच फळ विक्रेते हातगाडी लावून व्यवसाय करतात. या विक्रेत्यांनी चक्क आपल्या हातगाड्या रस्त्यावरच लावण्यास सुरूवात केली. त्यामुळे नगरपरिषदेने त्यांना वारंवार सूचना दिली. गांधी चौकातील भाजी व फळ विक्रेत्यांना नगरपरिषदेने पर्यायी जागा म्हणून आठवडी बाजारात जागा उपलब्ध करून दिली. मात्र सदर भाजी व फळ विक्रेते गांधी चौक ते डॉ. आंबेडकर चौक परिसरात रस्त्यावर हातगाड्या लावून अतिक्रमण करीत आहेत. त्यामुळे हा रस्ता अरुंद होऊन रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे परिसरात किरकोळ अपघात घडतात.
या सर्व हातगाड्या हटविण्यासाठी तीन दिवसापूर्वी येथील व्यापाऱ्यांनी एका मोर्चाव्दारे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाळे यांना एक निवेदन दिले. तसेच नागरिकांच्याही वारंवार तक्रारी येत होत्या. या सर्व बाबींचा विचार करून नगरपरिषदेने गुरूवारी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. गांधी चौक, डॉ. आंबेडकर चौक, सुभाष चौक, नाईक चौक, शिवाजी चौक, महात्मा फुले चौक आदी परिसरातील हातगाड्यांचे अतिक्रमण हटविले. यावेळी नगरपरिषद पथकासोबत जेसीबी आणि इतर वाहने होती. पोलिसांचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. काही जणांनी पथक निघून गेल्यानंतर पुन्हा त्याचठिकाणी हातगाड्या लावल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याविरुद्ध पुसद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाळे यांनी सांगितले. या मोहीमेत नगरपरिषदेचे अभियंता शिवकांत पांडे यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. आता ही मोहीम कितपत यशस्वी होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Action on Vegetable Sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.