पाणीटंचाईसाठी एक कोटी ७३ लाखांचा कृती आराखडा

By Admin | Updated: March 9, 2017 00:21 IST2017-03-09T00:21:07+5:302017-03-09T00:21:07+5:30

तालुक्यात सध्या विहिरी व तलावांना मुबलक पाणी असले तरी आगामी काळात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे.

Action Plan of Rs. One crore 73 lakh for water scarcity | पाणीटंचाईसाठी एक कोटी ७३ लाखांचा कृती आराखडा

पाणीटंचाईसाठी एक कोटी ७३ लाखांचा कृती आराखडा

पुसद तालुका : माळपठार भागात यंदाही हाहाकाराची शक्यता
पुसद : तालुक्यात सध्या विहिरी व तलावांना मुबलक पाणी असले तरी आगामी काळात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे. माळपठार भागात पाण्यासाठी यंदाही हाहाकार माजण्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने एक कोटी ७३ लाख ८६ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे.
कृती आराखड्यात नव्या विंधन विहिरींसह जुन्या विंधन विहिरींची दुरुस्ती, तात्पुरती नळयोजना, खासगी विहिरी अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीपुरवठा आदी उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. पुसद पंचायत समितीने जानेवारी ते मार्च अशा तीन महिन्यांसाठी तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतींसाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात विंधन विहिरी कार्यक्रम घेणे, तात्पुरती पूरक नळयोजना घेणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, खासगी विहीर अधिग्रहण करणे, विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे, टँकर व बैलगाडीद्वारा टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे.
तालुक्यातील एकूण ११९ गावांमध्ये १७ मार्चपर्यंत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या ठोस उपाययोजना अंमलात आणण्यात येणार आहे. या योजनेमध्ये खासगी विहिरींच्या अधिग्रहणासाठी ३६ लाख रुपये, नळयोजना विशेष दुरुस्तीसाठी दहा लाख, टँकर पाणीपुरवठ्यासाठी दहा लाख अशा प्रकारे तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात म्हैसमाळ, मारवाडी बु., पन्हाळा, हिवळणी तलाव, मोप, आमटी, पिंपळगाव ई., फेट्रा, इनापूर, माळआसोली, लाहोरा ई., जवळा, सावरगाव बं., मोहा ई., शिवानगर, रामनगर, माणिकडोह, फुलवाडी, कारला, आरेगाव आदी गावांचा समावेश आहे.
म्हैसमाळ येथे नळयोजना विशेष दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. दुसरा टप्पा हा १ एप्रिल ते ३० जून २०१७ या कालावधीत करण्यात येईल. त्यामध्ये नवीन विंधन विहीर घेणे, तात्पुरती पूरक नळयोजना, नळयोजना विशेष दुरुस्ती, खासगी विहिरी अधिग्रहण, टँकरद्वारा पाणीपुरवठा या सर्व कामांसाठी ९० लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये रोहडा, मांजरजवळा बु., अनसिंग, गौळ मांजरी, लोहरा ई., गोपवाडी, धनसळ, उपवनवाडी, पार्डी, भंडारी, लोभिवंतनगर, बान्सी, ज्योतीनगर, जामनी धुंदी, सांडवा, धनसिंगनगर, मांडवा, बजरंगनगर, बोरगडी, लक्ष्मीनगर, शिळोणा, चिरंगवाडी, शिळोणा (पाथरवाडी), हर्षी, गौळ खु., बाळूवाडी, बिबी, कुंभारी, बेलोरा खु., मोहा ई. या गावांमध्ये पाणीटंचाईसाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. माळपठार भागात मार्चअखेरपर्यंत पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. विहिरीतील पाण्याची उपलब्धता झपाट्याने कमी होवू लागली आहे. शेतीलाही ओलित करण्यासाठी पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे या सर्व पाणीटंचाईचा फटका नागरिकांसोबतच शेती व परिसरातील वन्यप्राण्यांनाही बसणार आहे. त्या अनुषंगाने आतापासूनच नियोजन आणि त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)

योग्य अंमलबजावणीची गरज
पुसद तालुक्यातील दरवर्षीची पाणीटंचाई पाहता एक कोटी ७३ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची योग्य व वेळेत अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांना दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागेल, याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.

 

Web Title: Action Plan of Rs. One crore 73 lakh for water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.