शाळा बांधकामात अपहाराचा आरोप
By Admin | Updated: June 21, 2014 02:11 IST2014-06-21T02:11:13+5:302014-06-21T02:11:13+5:30
तालुक्यातील विरकुंड येथे दोन वर्गखोल्या बांधण्यात आल्या़ या वर्गखोल्या बांधकामात मोठा अपहार झाल्याचा आरोप ...

शाळा बांधकामात अपहाराचा आरोप
वणी : तालुक्यातील विरकुंड येथे दोन वर्गखोल्या बांधण्यात आल्या़ या वर्गखोल्या बांधकामात मोठा अपहार झाल्याचा आरोप खुद्द पंचायत समिती सभापती शालिनी सोमलकर यांनी केला़ याबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली़ सभेत त्यांनी खोल्या बांधकामाचे बनावटी अंदाजपत्रकही सादर केले़ ते अंदाजपत्रक खोटे असल्याचे अखेर अधिकाऱ्यांना कबूल करावे लागले़
सर्व शिक्षा अभियानांतर्गत वणी तालुक्यातील विरकुंड येथे सन २०११-१२ मध्ये दोन वर्गखोल्या मंजूर झाल्या़ त्या दोन वर्गखोल्या वेगवेगळ्या बांधायच्या होत्या़ मात्र अभियंता व कंत्राटदार यांनी संगनमत करून वर्गखोल्या एकमेकांना जोडून बांधल्या़ त्यामुळे एका बाजुचे पिल्लर, गडर व भिंत यांचा खर्च कमी झाला़ तो संबंधितांनी हडप केल्याचा सभापतीचा आरोप आहे़ सभापतींनी या बांधकामाचे अंदाजपत्रक मागीतले असता त्यांना बनावटी अंदाजपत्रक देण्यात आले़ आर्णी पंचायत समितीमधील एका शाळेचे जोडखोल्याचे ते अंदाजपत्रक आहेत़ त्यामध्ये खोडातोड करून अंदाजपत्रक पुरविण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते़ या अंदाजपत्रकावर गट शिक्षणाधिकाऱ्याची स्वाक्षरी नाही़ सर्व शिक्षा अभियानाच्या यवतमाळ येथील कार्यकारी अभियंत्याची स्वाक्षरीही दुसऱ्यानेच केली आहे़ आर्णी पंचायत समितीचे नाव या अंदाजपत्रकावर स्पष्टपणे दिसून येत आहे़ या अंदाजपत्रकासोबत शाळा बांधकामाचा नकाशा जोडलेला नाही़ दोन खोल्याच्या बांधकामाचे आठ लाख रूपयाचे हे अंदाजपत्रक आहे़
त्यामध्ये ६० हजार रूपयाचे बाल क्रीडा साहित्याचा समावेश आहे़ मात्र शाळेत कोणतेही क्रीडा साहित्य अस्तित्वात दिसत नाही़ १९ जून रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सभापती शालिनी सोमलकर यांनी हे बनावटी अंदाजपत्रक अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना दाखविले तेव्हा अधिकाऱ्यांनी हे अंदाजपत्रक बनावटी असल्याचे कबुल केले़ तेव्हा सदर बांधकामाची चौकशी करण्यात यावी व भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी संगीता राजूरकर व उमा पीदुरकर यांनी केली आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)