लेखापाल, लिपीक पदावरील बढतीचा वनखात्यात घोळ

By Admin | Updated: March 6, 2016 03:08 IST2016-03-06T03:08:28+5:302016-03-06T03:08:28+5:30

यवतमाळ वनवृत्तांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या लेखापाल व लिपीक पदावरील बढतीचा घोळ सुरू आहे.

An accountant, clerk in the growing forest on the post of cleric | लेखापाल, लिपीक पदावरील बढतीचा वनखात्यात घोळ

लेखापाल, लिपीक पदावरील बढतीचा वनखात्यात घोळ

यवतमाळ वनवृत्त : दोन वर्षांपासून केवळ प्रतीक्षाच
यवतमाळ : यवतमाळ वनवृत्तांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या लेखापाल व लिपीक पदावरील बढतीचा घोळ सुरू आहे. बढतीस पात्र कर्मचाऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून पदोन्नतीसाठी प्रतीक्षेत राहावे लागत आहे. या घोळासाठी संबंधित लिपिकाला जबाबदार मानले जात असून त्यासंबंधीच्या तक्रारीही मुख्य वनसंरक्षकांकडे मोठ्या संख्येने केल्या गेल्याची माहिती आहे.
लिपीक पदावरील कर्मचाऱ्याला लेखापालपदी, तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी-वनमजुराला लिपीक पदावर बढती देणे अपेक्षित आहे. वनवृत्तात लेखापालाची आठ, तर लिपिकाची सात पदे रिक्त आहेत. पदोन्नतीद्वारे ही पदे तातडीने भरणे अपेक्षित असताना गेल्या दोन वर्षांपासून भिजत घोंगडे ठेवण्यात आले आहे.
सीसीएफ कार्यालयाच्या मर्जीतील एका कर्मचाऱ्याला ‘अ‍ॅडजेस्ट’ करण्यासाठी हा घोळ घातला जात असल्याचे सांगितले जाते. लिपीक दोन वर्षांपासून, तर १५ पात्र वनमजूर तीन वर्षांपासून बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. बढत्यांमध्ये अडसर ठरलेल्या ‘त्या’ वनकर्मचाऱ्याला सहा-सात वर्षांपूर्वी कोट्यामधून चुकीच्या पद्धतीने बढती दिली गेली होती, अशी ओरड आहे. आता तो खुल्या वर्गातून बढती मिळविण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे बोलले जाते. मुख्य वनसंरक्षकांनी बिंदूनामावलीनुसार तातडीने लिपीक व लेखापाल पदावरील बढत्यांचे आदेश जारी करण्याची अपेक्षा आहे. मात्र या कार्यालयाकडून केवळ एका लिपिकाच्या सोयीसाठी पदोन्नतीच्या फाईली थंड बस्त्यात टाकण्यात आल्या आहेत. त्याबाबत अनेकांनी तक्रारीही केल्या आहेत. या कार्यालयावर अडेलतट्टू धोरणाचा आरोपही वनकर्मचाऱ्यांच्या वर्तूळातून ऐकायला मिळत आहे. विशेष असे, शासनाच्या धोरणानुसार अमरावती, नागपूर, चंद्रपूर वनवृत्तात दोन वर्षांपूर्वीच लेखापाल व लिपीक पदावर पदोन्नती दिली गेली. यवतमाळ मात्र त्याला अपवाद ठरले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: An accountant, clerk in the growing forest on the post of cleric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.