अपघाताने संपविले अख्खे कुटुंब

By Admin | Updated: April 15, 2016 02:05 IST2016-04-15T02:05:07+5:302016-04-15T02:05:07+5:30

दोन वर्षापूर्वी पतीच्या अपघाती मृत्यूनंतर शिवणकाम करून आपल्या चिमुकलीचे पालन पोषण करणाऱ्या ...

Accidentally finished whole family | अपघाताने संपविले अख्खे कुटुंब

अपघाताने संपविले अख्खे कुटुंब

मायलेकीचा मृत्यू : शेजार धर्मात तरुणीने गमाविला प्राण
यवतमाळ : दोन वर्षापूर्वी पतीच्या अपघाती मृत्यूनंतर शिवणकाम करून आपल्या चिमुकलीचे पालन पोषण करणाऱ्या महिलेचाही गुरुवारी अपघाताने बळी घेतला. याच अपघातात तिची चिमुकलीही ठार झाली. अपघाताने अख्खे कुटुंबच संपविले. तर या महिलेला शेजार धर्म म्हणून मदत करणाऱ्या एका तरुणीलाही आपला प्राण गमवावा लागला.
यवतमाळ शहरातील चौसाळा मार्गावरील सिद्धेश्वरनगरात गुरुवारी दुपारी अपघात झाला. या अपघातात आशा अनंत बोडखे (३६) त्यांची मुलगी मयुरी अनंत बोडखे (५) आणि शेजारी सोनाली सुरेश मिश्रा (२६) या तिघी जागीच ठार झाल्या. दोन वर्षांपूर्वी यवतमाळच्या लोहारा चौकात अपघात झाला. या अपघातात आशा बोडखे यांचे पती अनंत बोडखे यांचा मृत्यू झाला. इलेक्ट्रीशियनचे काम करणाऱ्या अनंतच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आशावर येऊन पडली. पतीचा मृत्यू झाला तेव्हा त्यांची मयुरी अवघ्या तीन वर्षाची होती. यवतमाळच्या सिद्धेश्वरनगरात राहून पतीच्या मृत्यूनंतर शिवणकाम करून त्या मुलीचा सांभाळ करीत होत्या. तिच्यावर कोसळलेल्या संकटामुळे आणि जगण्याच्या जिद्दीने आशाला सिद्धेश्वरनगरात सर्वच जण मदत करीत होते. अशातच गुरुवारी आशाची मुलगी मयुरी हिचा दात दुखत होता. भरउन्हात रुग्णालयात जायचे तर आॅटोरिक्षाही मिळणे कठीण होते. उन्हातच या दोघी मायलेकी निघाल्या. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या सोनाली मिश्राला त्या पायी जाताना दिसल्या. कुठे जात असल्याची चौकशी केली. दवाखान्यात जात असल्याचे समजताच डॉक्टर माझ्या ओळखीचे आहे, माझ्या सोबत चला असे सोनालीने म्हणत दोघी मायलेकींना आपल्या अ‍ॅक्टीव्हावर बसविले. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. काळरूपी ट्रॅक्टरने अ‍ॅक्टीव्हाला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की या तिघींचाही जागीच मृत्यू झाला.
सोनाली ही सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सुरेश मिश्रा यांची मुलगी होती. बी.कॉम.पर्यंत शिक्षण झाल्यानंतर ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. सोबतच ब्युटी पार्लरचे काम करीत होती. कुणाच्याही मदतीला धावून जाण्याचा तिचा स्वभाव होता. गुरुवारीही अशीच शेजार धर्म पाळत असताना तिचा अपघाती मृत्यू झाला. एकाच नगरातील तिघींचा मृत्यू झाल्याचे कळताच सिद्धेश्वरनगरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी समोरील दृश्य पाहून प्रत्येक जण हळहळत होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आशा, सोनाली आणि चिमुकली मयुरी पाहून अनेकांच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या. या अपघाताबद्दल परिसरातील नागरिकांनी प्रचंड रोषही व्यक्त केला. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Accidentally finished whole family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.