दोन शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू
By Admin | Updated: November 2, 2014 22:39 IST2014-11-02T22:39:36+5:302014-11-02T22:39:36+5:30
जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या अपघाताच्या घटनांमध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. निंभा (ता.दिग्रस) येथे थे्रशरमध्ये अडकून तर फुलसावंगीनजीक वाहन अपघातात शेतकरी ठार झाला.

दोन शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू
यवतमाळ : जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या अपघाताच्या घटनांमध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. निंभा (ता.दिग्रस) येथे थे्रशरमध्ये अडकून तर फुलसावंगीनजीक वाहन अपघातात शेतकरी ठार झाला.
दिग्रस येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, निंभा येथील अरुण किसन लोखंडे (४०) हे गजानन गणथडे यांच्या शेतात थ्रेशरने सोयाबीन काढत होते. या मशीनमध्ये अडकलेले गवत काढताना अडकून अरुण लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी थ्रेशर मशीन खोलून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
अरुण लोखंडे याच्या मागे पत्नी, सहा मुली, मुलगा व मोठा आप्त परिवार आहे. पंचनामा आणि पुढील कारवाई दिग्रस पोलीस ठाण्याचे श्याम लांडगे, संजय नेटके, किसन राठोड यांनी पार पाडली. उत्तरीय तपासणी घटनास्थळीच डॉ. प्रशांत रोकडे यांनी केली. यावेळी पोलीस कर्मचारी कुमरे, मुनेश्वर आदी उपस्थित होते.
फुलसावंगी येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, शेतातील कापूस विक्रीसाठी आणताना वाहन उलटून झालेल्या अपघातात शेतकरी ठार झाला. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शिरपुल्ली ते फुलसावंगी दरम्यान घडली. परसराम भिक्कू राठोड (४५) रा. इवळेश्वर ता. माहूर असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
परसराम हे एम.एच.२६-एच-४८९२ या अॅपेने आपल्या शेतातील कापूस विक्रीसाठी फुलसावंगी येथे आणत होते. दरम्यान खराब रस्त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अॅपे उलटला. यात शेतकरी परसराम राठोड हे ठार झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली व मोठा आप्त परिवार आहे.
घटनेची तक्रार दत्ता भिक्कू राठोड (रा. घमापूर) यांनी दराटी पोलिसात दिली. ठाणेदार सागर इंगोले, पोलीस उपनिरीक्षक पंधरे, पोलीस शिपाई गेडाम, विजय चव्हाण, संभाजी मारकवार यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवना येथे रवाना केला.
शिरपुल्ली ते फुलसावंगी हा मराठवाडा ते विदर्भाला जोडणारा एकमेव मुख्य रस्ता आहे. त्यावर प्रचंड खड्डे पडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग महागाव अंतर्गत येत असलेल्या या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. जागोजागी पडलेले खड्डे आणि उखडलेली गिट्टी यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. अशाच प्रकारातून घडलेल्या घटनेत शेतकऱ्याचा नाहक बळी गेला.