शेतकऱ्यांना अपघात विम्याचे कवच

By Admin | Updated: March 5, 2016 02:46 IST2016-03-05T02:46:44+5:302016-03-05T02:46:44+5:30

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०१५-१६ या वर्षापासून राबविण्यात येणार आहे.

Accident insurance cover for farmers | शेतकऱ्यांना अपघात विम्याचे कवच

शेतकऱ्यांना अपघात विम्याचे कवच

दोन लाखांचे संरक्षण : गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
यवतमाळ : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०१५-१६ या वर्षापासून राबविण्यात येणार आहे. १ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१६ या कालावधीसाठी शेतकऱ्यांना अपघात विमा लागू राहणार आहे. यात शेतकऱ्यांना दोन लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
या योजनेचा लाभ सात-बारावरील नोंदीप्रमाणे १० ते ७५ वर्षे वयोगटातील राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांना विहित कागदपत्रांशिवाय इतर कोणतीही कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत.
योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या २४ तासासाठी ही योजना लागू राहणार असून शेतकऱ्यांना केव्हाही अपघात किंवा अपंगत्व आले तरीही या योजनेचा लाभ मिळणार आहे. विमाधारक शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी तसेच अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी अशा तिन्ही प्रकारच्या जीवित हानीसाठी दोन लाख रुपए तर अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड, पुणे ही कंपनी आणि बजाज कॅपिटल इन्शोरन्स ब्रोकिंग लिमीटेड या विमा सल्लागार कंपनीला प्राधिकृत केले आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपन्यांकडे स्वतंत्ररीत्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. सर्व खातेदार शेतकऱ्यांचा हप्ता राज्य शासनाद्वारे भरण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्यावतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरविला असल्यास त्याचा या योजनेशी काहीही संबंध असणार नाही. या योजनेचे लाभ स्वतंत्ररित्या मिळणार आहेत.
मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याची पत्नी, शेतकरी स्त्रीचा पती, अविवाहित मुलगी, आई, मुले, नातवंडे, विवाहित मुलगी या योजनेचे लाभ घेण्यासाठी वारसदार ठरणार आहेत. विम्याचा दावा प्राप्त करण्यासाठी अपघातग्रस्ताच्या नावाचा समावेश असलेला सात-बारा, फेरफार नोंद, वारसाची नोंद, अपघाताच्या स्वरुपानुसार विहित केलेली इतर कागदपत्रे यांची आवश्यकता आहे.
शेती करताना होणारे अपघात, रेल्वे, रस्त्यावरील अपघात, पाण्यात बुडून मृत्यू,  जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का बसणे,  वीज पडणे, खून, उंचावरुन पडून अपघात, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या, जनावरांच्या खाण्यामुळे/चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, दंगल, अन्य कारणांमुळे शेतकऱ्याचा मृत्यू होतो किंवा अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा सर्व शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Accident insurance cover for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.