अबब ! जिल्हा परिषदेच्या एकाच शाळेत १६ अपंग शिक्षक
By Admin | Updated: May 15, 2017 00:54 IST2017-05-15T00:54:42+5:302017-05-15T00:54:42+5:30
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया रविवारी राबविण्यात आली

अबब ! जिल्हा परिषदेच्या एकाच शाळेत १६ अपंग शिक्षक
समायोजनात तक्रारी : यवतमाळ पंचायतची प्रक्रिया उद्या
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया रविवारी राबविण्यात आली. इतर पंचायत समित्यांमधील समायोजन पार पडले, तरी यवतमाळ पंचायत समितीमध्ये मात्र ‘बोगस अपंगत्वा’च्या तक्रारींनी घोळ घातला. एकाच शाळेत तब्बल १६ शिक्षक अपंग असल्याचा अजब प्रकार उघड झाल्याने येथील समायोजनाची प्रक्रिया मंगळवारी राबविण्यात येणार आहे.
सकाळी १० वाजतापासून घाटंजी, बाभूळगाव, कळंब, आर्णी, नेर, झरी, पांढरकवडा आणि मारेगाव या पंचायत समितीमधील शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली. तर दुपारी २ वाजतापासून पुसद, उमरखेड, महागाव, वणी, दारव्हा, दिग्रस, राळेगाव, यवतमाळ पंचायत समित्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला आणि शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांची उपस्थिती होती.
यात प्रामुख्याने दुर्गम भागातील आणि द्विशिक्षकी शाळांना शिक्षक देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, प्रत्येक पंचायत समितीमध्ये १५ ते २० शिक्षक अतिरिक्त असताना रिक्त जागांची संख्या मात्र दुप्पट होती. बाभूळगाव पंचायत समितीत १२ शिक्षकांचे समायोजन झाले, मात्र रिक्त जागा २९ होत्या. त्यामुळे समायोजनानंतरही अनेक जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
समायोजनात अपंग, परितक्त्या, वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले. नेमका हाच धागा धरून यवतमाळ पंचायत समितीमधील काही शिक्षकांनी अपंगत्वाची प्रमाणपत्रे सादर केली.
यातील अनेक प्रमाणपत्रे बोगस असल्याच्या तक्रारी खुद्द शिक्षकांनीच केल्या. लोहारा येथील शाळेत १९ शिक्षक पदे असताना तेथील तब्बल १६ जणांनी अपंगत्वाची प्रमाणपत्रे सादर केली. उर्वरित ३ ूमहिला आहेत. त्यामुळे यवतमाळ पंचायत समितीची समायोजन प्रक्रिया स्थगित करून ती मंगळवारी १६ मे रोजी सीईओंच्या उपस्थितीत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यादी बदलावी लागली
समायोजनाची प्रक्रिया राबविण्यापूर्वी संबंधित पंचायत समितीमधील रिक्त पदांची यादी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे जिल्हास्तरावरून रवाना करण्यात आली. मात्र, बहुतांश पंचायत समित्यांनी ही यादी वेळेत जाहीर केलीच नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांना थेट समायोजनाची प्रक्रिया सुरू झाल्यावरच रिक्त जागांचे पर्याय पाहता आले. संचमान्यतेनुसार काही शाळांमध्ये अधिक पटसंख्या असूनही कमी शिक्षकांची पदे मंजूर दाखविण्यात आली. यावर वारंवार शिक्षकांनी आक्षेप घेतल्यामुळे रिक्त पदांची यादी दिवसभरात ३ ते ४ वेळा प्रशासनाला बदलावी लागली.