रेती माफियांना महसूलचे ‘अभय’
By Admin | Updated: December 6, 2014 22:57 IST2014-12-06T22:57:15+5:302014-12-06T22:57:15+5:30
झरीजामणी तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या कमळवेल्ली घाटावर गत एक महिन्यापासून पैनगंगेच्या पात्रात रेतीचा वारेमाप उपसा सूरू आहे. गेल्या वर्षभरात रेतीचा जितका उपसा झाला नाही,

रेती माफियांना महसूलचे ‘अभय’
पाटणबोरी : झरीजामणी तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या कमळवेल्ली घाटावर गत एक महिन्यापासून पैनगंगेच्या पात्रात रेतीचा वारेमाप उपसा सूरू आहे. गेल्या वर्षभरात रेतीचा जितका उपसा झाला नाही, तितका गेल्या महिनाभरात झाला आहे़
पैनगंगेला वर्षभर पाणी असते़ पावसाळ्यात तर ही नदी दुथडी भरूनच वाहते. या नदीत रेतीचा भरपूर साठा असतो. तथापि यावर्षी रेती घाटांचे लिलाव ३१ सप्टेंबरपर्यंतच असल्याने लिलावधारकाला पाहिजे त्या प्रमाणात रेतीचा उपसा करता आला नाही़ मात्र ३१ सप्टेंबरनंतर महसूल विभागाच्या मूक आशिर्वादाने रेती माफियाचे चांगलेच फावत आहे. महसूल विभागाचा एक अधिकारी व रेती माफियांचे ‘साटेलोटे‘ असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या आशिर्वादाने सध्या वारेमाप रेतीचा अवैध उपसा सुरू आहे.
संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने हे सर्व सुरू असल्याची चर्चा जोरात आहे. प्रति ट्रॅक्टर ५०० रूपये संबंधित अधिकाऱ्याला द्या आणि पाहिजे तितक्या रेतीचा उपसा करा, असे एका ट्रॅक्टर चालकानेच बोलून दाखविले़ दरवर्षी सप्टेंबर व आॅक्टोबर दरम्यान रेती घाट खुले झाल्यानंतर सदर अधिकारी अशाच प्रकारे रेती माफियांना रान मोकळे करून देतात, असेही त्याने कबूल केले. यात शासनाला लाखोंचा चुना लागत असून संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मात्र लाखोंचा मलीदा मिळत आहे.
हाच फंडा वापरून सदर महसूल अधिकाऱ्यांनी प्रचंड ‘माया‘ गोळा केल्याची चर्चा आहे. सदर अधिकारी कमळवेल्ली येथीलच मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे. यापूर्वी तलाठी असतानासुध्दा त्यांचा या रेती घाटावर एकतर्फी कब्जा होता, असे सांगण्यात येते. ट्रॅक्टर चालक व मालकांना कायद्याची भीती दाखवून धाकदपट करून अवैधरीत्या पैसे उकळले जाते़ सध्या कमळवेल्ली घाटावर २० ते २५ ट्रॅक्टर तसेच काही ट्रकनेसुध्दा दिवसरात्र रेती उपसा सुरू आहे़ त्यामुळे शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. (वार्ताहर)