औटघटकेची फौजदारी दहा दिवसात संपुष्टात येणार
By Admin | Updated: November 9, 2014 22:35 IST2014-11-09T22:35:53+5:302014-11-09T22:35:53+5:30
राज्याच्या पोलीस खात्यात फौजदारांची शेकडो पदे रिक्त होती. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना औटघटकेची बढती देण्यात आली. आता हा कालावधी संपत आला

औटघटकेची फौजदारी दहा दिवसात संपुष्टात येणार
यवतमाळ : राज्याच्या पोलीस खात्यात फौजदारांची शेकडो पदे रिक्त होती. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना औटघटकेची बढती देण्यात आली. आता हा कालावधी संपत आला असून दहा दिवसांनी त्यांची फौजदारी संपुष्टात येणार आहे. कर्मचाऱ्याचे फौजदार झालेल्या ४० जणांना पुन्हा आपल्या पूर्वपदावर कर्तव्य बजावावे लागणार असल्याने त्यांना चुटपूट लागली आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान अधिकाऱ्यांची उणिव भासू नये म्हणून गृह विभागाने एका आदेशान्वये सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांसाठी फौजदारी बहाल करण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आटोपताच आपल्याला पूर्वपदावर कर्तव्य बजावावे लागेल, असेही आदेशात नमूद होते.
पोलीस खात्यात दाखल झाल्यापासूनच अनेकांची फौजदार होण्याची सुप्त इच्छा असते. मात्र पदोन्नतीने थेट फौजदारकी मिळविणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांची इच्छा अपूर्ण राहते. गृह विभागाने काढलेल्या या आदेशाने औटघटकेचे का होई ना आपल्याला फौजदार होता येईल, या अपेक्षेने जिल्हा पोलीस दलातील अनेकांनी फौजदारीसाठी अर्ज केले होते. त्यातील निवडक ४० जणांना सेवाज्येष्ठतेनुसार निवडणुकीपूर्वी फौजदारी देण्यात आली. सध्या कार्यरत असलेल्या वेतनावरच संबंधित कर्मचाऱ्यांना ही फौजदारी देण्यात आली. आता निवडणूक आटोपून फौजदारीचा कालावधीही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. येत्या २३ नोव्हेंबरला हा कालावधी संपत आहे.
१० दिवसांनी फौजदारकी जाणार या भीतीने अनेकांना ग्रासले आहे. गृह विभागाने एखादा नवा पर्याय शोधून सेवाज्येष्ठांना फौजदारपदी कायम करावे, अशी अपेक्षा त्यांना असली तरी ते काही शक्य नाही. त्यामुळे अनेकांना चुटपूट लागली आहे. अनेकांनी तर फौजदाराच्या वर्दीतील फोटो आठवण म्हणून काढून ठेवले आहे. त्यांचा आता पुरता हिरमोड होणार असल्याचेही सांगण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)