लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहरातील स्टेट बँक चौकात महिनाभरापूर्वी भरधाव दुचाकी घेऊन जाणाऱ्या युवतीने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर दोघात वाद झाला. मुलीने आरडाओरडा केला, आजूबाजूचे धावून आले. त्यांनी त्या युवकाला चांगला चोप दिला. या घटनेचा राग युवकाच्या मनात होता. कोणतीच चूक नसताना जमावाचा मार पडला, यातच त्याचा स्वाभिमान दुखावला गेला. याचा वचपा काढण्यासाठी त्याने त्या विद्यार्थिनीशी ओळख वाढविली. संधी मिळताच तिला मादनी घाटात नेऊन ठार केले. भला मोठा दगड तिच्या चेहऱ्यावर सलग चार वेळा आदळला. या कबुली जबाबातून विद्यार्थिनीच्या खुनाचा गुन्हा उघड झाला.
प्रमोद नथ्थूजी कोंदाने (रा. बनकर ले-आऊट वाघापूर) असे आरोपीचे नाव आहे. ५ डिसेंबर रोजी धनश्री पेटकर ही महाविद्यालयात जाण्यासाठी घरून निघाली, तिची दुचाकी नादुरुस्त असल्याने ती पायदळ जात होती. वाघापूर बायपासवर एका पेट्रोल पंपासमोर प्रमोद उभा होता. यावेळी धनश्रीने त्याला कॉलेजपर्यंत सोडण्याची विनंती केली. त्यावरून प्रमोदने धनश्रीला जाजू कॉलेजमध्ये सोडले. घरी परत जाण्यासाठी घ्यायला येण्याचीही विनंती धनश्रीने केली. सायंकाळी ५ वाजता धनश्री प्रमोदच्या प्रतीक्षेत होती. मात्र प्रमोद येणार नाही असे वाटल्याने धनश्रीने तिचा मित्र आदित्य याला कॉल केला. दरम्यान, प्रमोद तेथे पोहोचला. त्याने धनश्रीला गाडीवर बसविले व मादनी येथे मजुरीचे पैसे देण्यासाठी जायचे आहे, लवकर परत येऊ असे धनश्रीला सांगितले. यावर धनश्रीनेही होकार दिला.
धनश्रीला घेऊन प्रमोद दुचाकीने बोरगाव डॅम रस्त्याने निघाला. मादनी घाटात त्याने निर्जनस्थळी दुचाकी थांबविली व तेथे तुझ्यामुळे मला जमावाचा मार पडला. याची आठवण करून दिली. यावर धनश्रीची प्रतिक्रिया ऐकून प्रमोदने तिला जमिनीवर आपटले. ती दगडावर पडल्याने जागेवरच बेशुद्ध झाली. यानंतर अतिशय निदर्थीपणे प्रमोदने धनश्रीच्या चेहऱ्यावर सलग चार वेळा दगडाने प्रहार केले. यातच धनश्री गारद झाली, अशी कबुली प्रमोदने पोलिसांना दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास ग्रामीण ठाणेदार प्रशांत कावरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
यांनी केला गुन्हा उघडपोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक पीयूष जगताप, एलसीबी प्रमोद ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक सुगत पुंडगे, अमोल मुडे, सहायक फौजदार योगेश गटलेवार, साजीद सय्यद, बंडू डांगे, जमादार अजय डोळे, प्रशांत हेडावू, योगेश डगवार, रितुराज मेडवे, शिपाई सलमान शेख, देवेंद्र होले, योगेश टेकाम, सुनील मेश्राम यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अटक केली.
असा लागला गुन्ह्याचा शोध
- खुनाच्या घटनेचा तपास करताना पोलिसांकडे कुठलाच सुगावा नव्हता. लास्ट सीन यावरच सर्व तपास गुरफटत होता. त्यावरून पोलिसांनी अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
- धनश्रीकडून शेवटचा फोन कॉल झाला त्या युवकालाही चौकशीसाठी बोलाविण्यात आले. मात्र काहीच निष्पन्न होत नव्हते. एका ठिकाणी मिळालेले सीसीटीव्ही फुटेज, धनश्रीने मैत्रिणीकडे प्रमोद सोबत जातो, असे सांगितले होते.
- यावरून आरोपीपर्यंत पोलिस पोहोचले. त्याने घटनेची कबुली दिली. प्रमोद हा विवाहित असून त्याला एक मूल आहे व त्याची पत्नी गर्भवती आहे. दूध विक्रीचा व्यवसाय तो करीत होता. केवळ अपमानाचा बदला घेण्यातून ही घटना घडली आहे.