९९ वर्षांची आजी उपोषणावर !
By Admin | Updated: June 21, 2016 02:09 IST2016-06-21T02:09:38+5:302016-06-21T02:09:38+5:30
९९ वर्षांचे वय म्हणजे अर्ध्या गोवऱ्या पोहोचलेल्याच. पण जगण्याची लढाईच एवढी तीव्र की, अखेरचा श्वासही युगासारखा

९९ वर्षांची आजी उपोषणावर !
नातवाचा पोसण्यास नकार : दुसऱ्या वारसाला नोकरी देण्याची मागणी
दिग्रस : ९९ वर्षांचे वय म्हणजे अर्ध्या गोवऱ्या पोहोचलेल्याच. पण जगण्याची लढाईच एवढी तीव्र की, अखेरचा श्वासही युगासारखा वाटावा! त्यामुळेच दिग्रसमधील ९९ वर्षांच्या केसरबाईला उपजिविकेसाठी नगरपरिषदेपुढे उपोषणाला बसावे लागले. या सत्याग्रहाने प्रशासनाची पंढरी शंभर टक्के घाबरली!
केसरबाई रामनाथ सोनवाल (९९) या नगरपरिषदेत सफाई कर्मचारी होत्या. त्यांनी वशीला वारस पद्धतीने नातू राजेश मोहन सोनवाल याला आपली नोकरी दिली. मात्र, नोकरी मिळाल्यावर त्याने केसरबाईचे कोणतेही पालनपोषण केले नाही, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे केसरबाईपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे आता आपली नोकरी राजेश सोनवाल याच्याऐवजी कीर्ती नितीन सोनवाल या नातीला देण्याची मागणी केली. त्यासाठी त्यांनी २३ मे रोजी निवेदन देऊन १५ दिवसात कीर्तीला नोकरी देण्याची मागणी केली. १० जूनपासूनच आमरण उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिला होता. मात्र, प्रकृती बरी नसल्याने केसरबार्इंनी १० दिवस आराम केला आणि सोमवारी २० जूनपासून नगरपरिषदेपुढे उपोषणाला बसल्या.
९९ वर्षांची वृद्धा आमरण उपोषणाला बसल्याने नगरपरिषद प्रशासनाची झोपच उडाली. मुख्याधिकारी टाले यांनी उपोषण मंडपाकडे धाव घेऊन केसरबार्इंचे म्हणणे जाणून घेतले. आश्वासनाचे पत्र आणि सोबतच शितपेय देऊन त्यांनी उपोषण सोडवून घेतले. ज्येष्ठ नागरिकांच्या पालनपोषणाचा प्रश्न गंभीर असल्याचे या उपोषणाने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)