पांढरकवडा येथील बँकेतून ग्राहकाचे ९५ हजार उडविले
By Admin | Updated: July 15, 2016 02:36 IST2016-07-15T02:36:49+5:302016-07-15T02:36:49+5:30
आयकर अधिकारी असल्याची बतावणी करून पैैसे भरण्यासाठी बँकेत गेलेल्या ग्राहकाचे ९५ हजार रूपये लंपास केल्याची घटना...

पांढरकवडा येथील बँकेतून ग्राहकाचे ९५ हजार उडविले
बँक आॅफ महाराष्ट्र : आयकर अधिकारी असल्याची बतावणी
पांढरकवडा : आयकर अधिकारी असल्याची बतावणी करून पैैसे भरण्यासाठी बँकेत गेलेल्या ग्राहकाचे ९५ हजार रूपये लंपास केल्याची घटना गुरूवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास येथील महाराष्ट्र बँकेत घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
येथील मुख्य मार्गावर बँक आॅफ महाराष्ट्रची शाखा आहे. व्यापारी दिलीप किसनचंद बजाज यांनी नोकर सुमित जयंत राखुंडे याला महाराष्ट्र बँकेत पैसे जमा करण्यासाठी एक लाख ८७ हजार रूपये दिले. नेहमीप्रमाणे तो गुरुवारी महाराष्ट्र बँकेत पैसे भरण्यासाठी गेला. बजाज यांची आयडीया मोबाईल नेटवर्क एजंसी असून ते दररोज महाराष्ट्र बँकेत त्यांच्या व्यवसायाचे पैसे जमा करतात. बँकेत आधीच हजर असलेला एक भामटा सुमितजवळ आला. ‘मी आयकर विभागाचा अधिकारी असून मला तुमची बॅग तपासायची आहे’, असे म्हणून त्याने ती बॅग सुमितजवळून घेतली. पांढरकवडा येथे मोठ्या प्रमाणात नकली नोटा आल्या असल्याने बॅगेतील नोटा तपासायच्या आहेत, असेही तो म्हणाला. पैशाची बॅग उघडताच क्षणाचाही विलंब न करता त्या भामट्याने हजार व पाचशेच्या नोटांचे बंडल, असे ९५ हजार रूपये बॅगेतून उचलले व बँकेतून पोबारा केला. बँकेच्या बाहेरच दुचाकी घेऊन उभा असलेल्या त्याच्या सहकाऱ्याच्या दुचाकीवरून बसून तो पसार झाला. सुमितने आरडाओरड करताच बँकेच्या परिसरात बरीच गर्दी जमा झाली होती. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गुलाबराव वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष माने ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अज्ञात भामट्यांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)