९३५ कोटी थकबाकीतून केवळ पाच कोटी वसूल
By Admin | Updated: January 23, 2017 00:59 IST2017-01-23T00:59:04+5:302017-01-23T00:59:04+5:30
नोटाबंदी, सततचा दुष्काळ आणि शेतमालाचे पडलेले भाव यामुळे जिल्हा बँकेची कर्ज वसुली ठप्प झाली आहे.

९३५ कोटी थकबाकीतून केवळ पाच कोटी वसूल
जिल्हा बँक चिंतेत : नोटाबंदी, दुष्काळी स्थिती कारणीभूत
यवतमाळ : नोटाबंदी, सततचा दुष्काळ आणि शेतमालाचे पडलेले भाव यामुळे जिल्हा बँकेची कर्ज वसुली ठप्प झाली आहे. थकीत आणि चालू असे ९३५ कोटी रुपये शेतकऱ्यांकडे थकीत असताना आतापर्यंत केवळ पाच कोटी रुपयांचीच वसुली झाली आहे. यामुळे जिल्हा बँक चिंतेत पडली असून वसुली कशी करावी, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. राष्ट्रीयकृत बँकांच्या दुप्पटीने शेतकऱ्यांंना कर्जाचे वितरण केले जाते. दरवर्षी या बँकेची वसुली समाधानकारक असते. परंतु यावर्षी ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या नोटाबंदी निर्णयाने जिल्हा बँक अडचणीत आली. या बँकेला नोटाबंदीत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलवून देण्यास बंदी होती, ती आजही कायम आहे. तसेच नवीन नोटाही या बँकेला महिनाभरानंतर मिळाल्या. त्यामुळे या बँकेचे व्यवहार ठप्प झाले होते. त्याचा परिणाम जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीवर झाला आहे.
गतवर्षी जिल्हा बँकेने ४३५ कोटी रुपयांच्या खरीप पीक कर्जाचे वाटप केले होते. तर ५३४ कोटी रुपये आतापर्यंतचे थकीत आहे. दोनही मिळून हा आकडा ९३५ कोटींवर जाऊन पोहोचला. खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीची आशा होती. परंतु बाजारात शेतमालाचे भाव गडगडले. परिणामी जिल्हा बँकेला वसुली करणे कठीण झाले आहे. दुसरीकडे उत्तम पीक परिस्थिती दर्शविल्याने आणेवारीही अधिक आली. त्यामुळे बँकांचा कर्ज वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडे पैसेच नाही. त्यामुळे नोटीस आल्यानंतरही कर्जाची परतफेड करताच आली नाही.
आतापर्यंत केवळ पाच कोटी २३ लाख रुपयांची वसुली झाली आहे. यामध्ये नियमित कर्जदार शेतकऱ्यांनी चार कोटी ६४ लाख रुपयांची तर थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी ५९ लाख रुपयांची परतफेड केली आहे. थकीत कर्जाच्या तुलनेत अर्धाटक्काही वसुली झाली नाही. त्यामुळे आता जिल्हा बँकेचे अधिकारी चिंतेत सापडले आहे. वसुलीसाठी पथकांची नेमणूक केली आहे. परंतु नोटाबंदीमुळे आजही ग्रामीण भागातील व्यवहार सुरळीत झाले नसल्याने नोटाबंदीचे कारण दिले जाते. (शहर वार्ताहर)