सर्वसेवा पतसंस्थेत ९३ लाखांचा अपहार

By Admin | Updated: May 7, 2015 23:59 IST2015-05-07T23:59:57+5:302015-05-07T23:59:57+5:30

पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवीची मुदत संपल्यानंतरही पैसे परत न करणाऱ्या येथील सर्वसेवा व्यापारी संकूल पतसंस्थेच्या विरोधात ठेवीदारांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

93 crores of crores of services | सर्वसेवा पतसंस्थेत ९३ लाखांचा अपहार

सर्वसेवा पतसंस्थेत ९३ लाखांचा अपहार

यवतमाळ : पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवीची मुदत संपल्यानंतरही पैसे परत न करणाऱ्या येथील सर्वसेवा व्यापारी संकूल पतसंस्थेच्या विरोधात ठेवीदारांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दहा ठेवीदारांची तब्बल ९३ लाख २८ हजार ५६० रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी पतसंस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम काकडे यांच्यासह तिघांना अटक केली आहे.
यवतमाळच्या गोदनी मार्गावरील जाजू चौकात सर्वसेवा व्यापार संकूल पतसंस्थेचे कार्यालय आहे. पूर्वी हे कार्यालय आर्णी मार्गावरील सहकार भवनात होते. या ठिकाणी अनेकांनी गुंंतवणूक म्हणून आपल्या ठेवी ठेवल्या. परंतु अलिकडच्या काही वर्षात ठेवीदारांना पैसेच दिले जात नव्हते. उलट टाळाटाळ केली जात होती. अखेर आज दहा जणांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार मनोहर नथ्थूजी ठाकरे रा. नंदनवन सोसायटी यांचे १५ लाख ७० हजार रुपये, प्रेमिला उमरेडकर रा. उमरसरा यांचे १५ लाख ८० हजार रुपये, विनायक टाके यांचे ४५ लाख रुपये, तसेच मंजूषा भीमराव पाटील यांनी आपल्या प्राजक्ता व प्रणिता या दोन मुलींच्या नावावर गुंतविलेली रक्कम तसेच इतरांची रक्कम मिळून ९३ लाख २८ हजार ५६० रुपये फसवणूक केल्याची तक्रारीत म्हटले आहे.
वडगाव रोड पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पतसंस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम काकडे, सचिव अशोक पेटेवार, माजी अध्यक्ष शमशुद्दीन काझी या तिघांना अटक केली आहे. तर पतसंस्थेच्या कार्यकारी संचालक उषा काकडे पसार झाल्या आहेत.
पुरुषोत्तम काकडे हे जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेत काही वर्ष व्यवस्थापक होते. त्यानंतर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. नुकतेच ते सीईओ पदावरुन निवृत्त झाले आहे. याच काळात त्यांनी सर्वसेवा व्यापारी संकूल पतसंस्थेची स्थापना केली. या पतसंस्थेत ठेवी ठेवणाऱ्यांमध्ये बहुतांश शिक्षकांचा समावेश आहे. गत काही दिवसांपासून आर्णी मार्गावरील सहकार भवनातील पतसंस्थेच्या कार्यालयाला टाळे होते. दरम्यान जाजू चौकात कार्यालय उघडण्यात आले होते. या संस्थेचे सचिव असलेले अशोक पेटेवार हे जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेत कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत आहे. या पतसंस्थेत ठेवलेला ठेवीदारांचा पैसा रियल इस्टेटमध्ये गुंतविल्याची माहिती असून रियल इस्टेटचा व्यवसायात मंदी आल्याने ठेवीदारांचे पैसे देणे शक्य झाले नाही. गत काही दिवसांपासून तगादा लावूनही पैसे मिळत नसल्याने शेवटी ठेवीदारांनी पोलिसात धाव घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: 93 crores of crores of services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.