९० आदिवासी विद्यार्थी उपाशीच

By Admin | Updated: December 10, 2014 23:05 IST2014-12-10T23:05:43+5:302014-12-10T23:05:43+5:30

येथील वऱ्हाडी आवळास्थित शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील तब्बल ९० विद्यार्थ्यांना ९ डिसेंबर रोजी दिवसभर उपाशीच राहावे लागण्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

90 tribal students hunger strike | ९० आदिवासी विद्यार्थी उपाशीच

९० आदिवासी विद्यार्थी उपाशीच

दिग्रस : येथील वऱ्हाडी आवळास्थित शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील तब्बल ९० विद्यार्थ्यांना ९ डिसेंबर रोजी दिवसभर उपाशीच राहावे लागण्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. उल्लेखनीय म्हणजे या वसतिगृहाला जिल्हा परिषद अध्यक्षा आरती फुफाटे यांनी भेट देवून संबंधित विभागाला विद्यार्थ्यांना योग्य सोयीसुविधा त्वरित पुरविण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला संबंधितांनी केराची टोपली दाखविल्याचेच या घटनेवरून स्पष्ट होते.
मागील आठवड्यात जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.फुफाटे यांनी अचानक बाजीरावनगर येथील वऱ्हाडी आवळास्थित शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाला भेट देवून पाहणी केली होती. त्यावेळी या वसतिगृहातील विदारक परिस्थिती त्यांनी प्रत्यक्ष पाहिली. तसेच विद्यार्थ्यांनी तक्रारी ऐकून घेतल्या. या प्रकरणी त्यांनी त्वरित एटीसी आत्राम व संबंधितांना आदेश देवून वसतिगृहातील मुलांची पुन्हा कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची कटाक्ष्याने काळजी घेण्याचे सांगितले. तसेच कोणतीही अडचण असल्यास स्वत:चा भ्रमणध्वनी देवून संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले होते. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी ९ डिसेंबर रोजी डॉ.फुफाटे यांना संपर्क करून पुन्हा एकदा वसतिगृहाला भेट देण्याची विनंती केली. त्यामुळे त्याच दिवशी रात्री ८ वाजता डॉ.आरती फुफाटे यांनी वसतिगृह गाठले.
यावेळी विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील अस्वच्छता, सडलेली फळे, शाळेच्या वेळेपर्यंत जेवण न देणे, स्वच्छ दूध व पाणी न मिळणे, शालेय साहित्याचे वाटपच न करणे, या सगळ्या बाबींसोबत आज संपूर्ण दिवस आम्ही उपाशी असल्याचे सांगितले. यावेळी डॉ.फुफाटे यांनी त्वरित पुसद, यवतमाळ, अमरावती व नाशिक येथील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु एकाही अधिकाऱ्यांनी त्यांचा दूरध्वनी उचलला नाही. शेवटी वसतिगृहातील अधीक्षकांनी ९० विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये आजच्यापुरती जेवणाची व्यवस्था करण्याचे कबूल केले.
यावेळी डॉ.फुफाटे यांनी या सर्व ढिसाळ कारभाराबाबत आंदोलन करून संबंधितांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या गैरसोयीविरुद्ध उपोषण करणार असल्याचेही बोलून दाखविले.
संबंधित वसतिगृहाचा ठेका पुसद येथील संतोष मोटे यांचा असून पप्पू ठाकूर नामक इसम हा कंत्राट प्रत्यक्ष चालवितात. उल्लेखनीय म्हणजे या दोन्ही कंत्राटदारांच्या डोक्यावर पुसद येथील एका मोठा राजकीय व्यक्तीचा वरदहस्त असल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)

Web Title: 90 tribal students hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.