वैद्यकीय महाविद्यालयात दरमहा ९०० प्रसूती
By Admin | Updated: April 26, 2015 00:05 IST2015-04-26T00:05:13+5:302015-04-26T00:05:13+5:30
शासकीय रुग्णालयांमधील अत्याधुनिक उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टर आणि सुधारलेली सेवा पाहून रुग्णांचा कल या रुग्णालयांकडे वाढला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात दरमहा ९०० प्रसूती
शासकीय रुग्णालयांकडे वाढतोय कल : खासगी नर्सिंग होममधील प्रसूतीत वर्षभरात १८ टक्क्यांनी घट
यवतमाळ : शासकीय रुग्णालयांमधील अत्याधुनिक उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टर आणि सुधारलेली सेवा पाहून रुग्णांचा कल या रुग्णालयांकडे वाढला आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिन्याकाठी होणाऱ्या ८०० ते ९०० प्रसूती त्याचेच द्योतक मानले जात आहे. ग्रामीण भागातही रुग्णांचे पाय आता शासकीय रुग्णालयांकडे वळू लागले आहे.
शासकीय रुग्णालये म्हटले की, अंगावर काटा उभा राहतो, अशीच कुणीचीही प्रतिक्रिया. तेथील सेवा, वागणूक, अव्यवस्था, अस्वच्छता याबाबत कायमच बोटे मोडणारी मंडळी समाजात कुठेही दिसेल. परंतु आता हे चित्र बदलत आहे. शासन आरोग्य सेवेवर वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असल्याने शासकीय रुग्णालयांनीही काही प्रमाणात का होईना कात टाकली आहे. ओळखी असणाऱ्यांनाच चांगली सेवा मिळते हा भ्रमही दूर होतो आहे. अनोळखी आणि सामान्यातील सामान्यांनासुद्धा कोणाच्याही फोनशिवाय चांगली वागणूक व उपचार शासकीय रुग्णालयांमध्ये मिळायला लागले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
शासकीय रुग्णालयांमध्ये अद्यावत उपकरणे, सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. प्रबोधन, समूपदेशन व कारवाईच्या भीतीने आरोग्य यंत्रणा शासकीय रुग्णालयात वेळ देऊ लागली आहे, त्यांची रुग्ण व नातेवाईकांसोबतची वागणूक सुधारत असल्याचे सकारात्मक चित्र पहायला मिळते आहे.
शासकीय रुग्णालयाकडील ग्रामीणच नव्हे तर शहरी सुशिक्षितांचा कलसुद्धा वाढला आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दरदिवशी तीन ते चार हजार रुग्ण तपासणीसाठी येतात. महिन्याकाठी तेथे ८०० ते ९०० प्रसूती केल्या जातात. ग्रामीण भागातसुद्धा आकडेवारी वाढली आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये गेल्या वर्षभरात ३६ हजार ९४६ प्रसूती झाल्या आहेत. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात २१ टक्के अर्थात ७ हजार ७६९, ग्रामीण-उपजिल्हा रुग्णालयात २४ टक्के (८७५९) तर वैद्यकीय महाविद्यालय २४ टक्के (८७९८) प्रसूति झाल्या आहेत. खासगी रुग्णालयातील प्रसूतिचा आकडा दहा हजार ९१२ एवढा आहे. खासगी रुग्णालयात यापूर्वी प्रसूतिचे प्रमाण ४८ टक्के होते. गेल्या वर्षभरात ते १८ टक्क्यांनी घटून ३० टक्क्यावर आले आहे.
शासनाच्या उपकेंद्रातसुद्धा २ हजार ८२८ प्रसूती झाल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दर महिन्याला दीडशे ते दोनशे महिलांचे सिजरीन केले जात असल्याचीही माहिती आहे. शासकीय रुग्णालयात गर्भवती मातांच्या मृत्यूचे प्रमाण दहा हजारामागे १२ असे आहे.
तर खासगी रुग्णालयात हे प्रमाण दहा हजारामागे दोन एवढे आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी शासकीय स्तरावर आणखी प्रयत्न केले जात आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)
लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना शासकीय रुग्णालयाची सक्ती करावी - दर्डा
खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य, महापालिका सदस्य, नगरपरिषद सदस्य अशा सर्व लोकप्रतिनिधींना तसेच शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी कुटुंबासह शासकीय रुग्णालयातच उपचार घेण्याची अपेक्षा अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली. या सर्वांना शासकीय रुग्णालयातील उपचाराचीच सक्ती केली जावी, असे मतही त्यांनी नोंदविले. खुद्द जिल्हाधिकारी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात येत असताना त्यांच्या कनिष्ठ यंत्रणेला त्याबाबत कमीपणा का वाटावा असा प्रश्नही विजय दर्डा यांनी उपस्थित केला.
बालमृत्यूचे प्रमाण घटले
जिल्ह्यात पूर्वी बालमृत्यूचे प्रमाण एक हजारामागे ४० एवढे होते. मात्र सध्या हे २० वर आहे. ते आणखी कमी करण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणेकडून केला जात आहे. शासनाने गर्भवती, स्तनदा माता आणि बालकांसाठी सुरू केलेल्या पोषण आहार योजना, घरपोच आरोग्य सेवा याचा हा सकारात्मक परिणाम मानला जात आहे.