‘सीआरएफ’मधून ८६१ कोटींचे रस्ते प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST2020-07-20T05:00:00+5:302020-07-20T05:00:14+5:30

जिल्ह्यातील आमदारांनी एकूण ८६१ कोटी ९९ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या २७ कामांचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांकडे सादर केले आहे. येथून हे प्रस्ताव अमरावती येथे मुख्य अभियंत्यांकडे पाठविले गेले. मात्र तेथून सध्या १८ प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आले आहे. उर्वरित नऊ प्रस्तावांचा दुसऱ्या टप्प्यात विचार होणार आहे. ‘सीआरएफ’च्या कामांचे सर्वाधिक प्रस्ताव भाजपच्या आमदारांचे आहे.

861 crore roads proposed from CRF | ‘सीआरएफ’मधून ८६१ कोटींचे रस्ते प्रस्तावित

‘सीआरएफ’मधून ८६१ कोटींचे रस्ते प्रस्तावित

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम : सर्वाधिक १६९ कोटींची मागणी उईकेंची

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आपल्या विधानसभा मतदारसंघात दळणवळणाची उत्तम कनेक्टीव्हीटी निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांनी ८६१ कोटींची कामे प्रस्तावित केली आहे. केंद्रीय रस्ते निधीमधून ही कामे मंजूर करून तेवढा निधी मिळविण्याचा आमदारांचा प्रयत्न आहे.
केंद्रीय रस्ते निधी अर्थात ‘सीआरएफ’मधून निधी मिळावा म्हणून आमदारांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. जिल्ह्यातील आमदारांनी एकूण ८६१ कोटी ९९ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या २७ कामांचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांकडे सादर केले आहे. येथून हे प्रस्ताव अमरावती येथे मुख्य अभियंत्यांकडे पाठविले गेले. मात्र तेथून सध्या १८ प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आले आहे. उर्वरित नऊ प्रस्तावांचा दुसऱ्या टप्प्यात विचार होणार आहे. ‘सीआरएफ’च्या कामांचे सर्वाधिक प्रस्ताव भाजपच्या आमदारांचे आहे. जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपचे आहेत.
सर्वाधिक १६९ कोटी ९२ लाख रुपयांची आठ कामे राळेगावचे भाजपचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी प्रस्तावित केली आहे. आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी १४९ कोटी नऊ लाखांची तीन कामे प्रस्तावित केली. यवतमाळचे आमदार मदन येरावार यांनी १०७ कोटींची चार कामे प्रस्तावित केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे संजय राठोड यांनी १२ कोटी सात लाख रुपये किंमतीचे एकच काम प्रस्तावित केले आहे. वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी एकूण ८३ लाखांची दोन कामे प्रस्तावित केली. उमरखेडचे आमदार नामदेव ससाने यांनी पाच कामांसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाला ११० कोटींच्या निधीची मागणी केली आहे. भाजपचे विधान परिषद सदस्य नीलय नाईक यांनी ४१ कोटी १८ लाख रुपये किंमतीची दोन कामे सूचविली आहे. पुसद येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांनी तीन कामांसाठी ७८ कोटी ७९ लाख रुपयांची मागणी करणारे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याला सादर केले आहे. पुसद येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी दोन कामांसाठी ६० कोटींच्या निधीची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गाचे रुंदीकरण, काँक्रीटीकरण, लहान-मोठ्या पुलांचे निर्माण, गतिमान वाहतूक निर्माण करणे यासाठी या निधीची मागणी केली आहे. सुरुवातीला ६७२ कोटींची ही कामे होती. त्यात १८९ कोटींच्या आणखी सात कामांची भर पडली.

दारव्हा रोडचे काँक्रीटीकरण करणार
आमदार मदन येरावार यांच्या यवतमाळ मतदारसंघातील शहराबाहेर जाणाऱ्या प्रमुख मार्गांचे काँक्रीटीकरण झाले आहे. आता दारव्हा रोडवरील दक्षता भवन ते लोहारा चौक या मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ६८ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. दहा वर्षांपूर्वी या मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण तसेच सौंदर्यीकरण करण्यात आले होते. काँक्रीटीकरणाच्या प्रतीक्षेत यवतमाळातील हा एकमेव मार्ग सध्या शिल्लक आहे. त्याचाही प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याला सादर केला आहे.

Web Title: 861 crore roads proposed from CRF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.