८४० घरकुलांचा हप्ता उचलूनही बांधकाम नाही
By Admin | Updated: December 16, 2014 23:02 IST2014-12-16T23:02:07+5:302014-12-16T23:02:07+5:30
बेघरांना हक्काचे घर मिळावे याउद्देशाने सुरू करण्यात आलेल्या घरकुल योजनेच्या उद्देशाला उमरखेड तालुक्यात तडा दिला जात आहे. जवळपास ८४० घरकुलांचे हप्ते उचलून बांधकाम केलेच नसल्याचे पुढे आले आहे.

८४० घरकुलांचा हप्ता उचलूनही बांधकाम नाही
राजाभाऊ बेदरकर - उमरखेड
बेघरांना हक्काचे घर मिळावे याउद्देशाने सुरू करण्यात आलेल्या घरकुल योजनेच्या उद्देशाला उमरखेड तालुक्यात तडा दिला जात आहे. जवळपास ८४० घरकुलांचे हप्ते उचलून बांधकाम केलेच नसल्याचे पुढे आले आहे. हा सगळा प्रकार प्रशासनाने दलालांच्या लागेबांध्यातून सुरू असून, वरिष्ठांचे मात्र दुर्लक्ष होत आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत रमाई घरकुल योजना, इंदिरा आवास योजना, कोलाम घरकुल योजना आणि राजीव गांधी क्र. १ घरकुल योजना आदी राबविण्यात येतात. परंतु या योजनांची पंचायत समितीस्तरावरच अंमलबजावणी होत असताना मुळ उद्देशाला तडा दिला जात आहे. या विविध योजनेंतर्गत राजकीय फंडा वापरून घरकुल मंजूर करून घ्यायचे, त्याबदल्यात पहिल्या हप्त्याची राजरोस उचल करायची, पुन्हा शिफारस लावून दुसरा हप्ता उचलायचा यासाठी दलालांचा आधार घ्यायचा आणि घरकुल अर्धवट सोडून शासकीय अनुदानावर डल्ला मारायचा असा काहीसा प्रकार सुरू आहे. उमरखेड पंचायत समिती अंतर्गत जवळपास ८४० घरकुलांच्या हप्त्यांची उचल करण्यात आली. परंतु बांधकाम झाले नसल्याचे दिसून येते.
उमरखेड पंचायत समिती अंतर्गत २०१०-११ मध्ये रमाई घरकुल योजनेंतर्गत ७३१ घरकुल मंजूर झाले. त्यामध्ये ७१७ लाभार्थ्यांनी पहिला हप्ता तर ७२० लाभार्थ्यांनी दुसऱ्या हप्त्याची उचल केली. पहिला हप्ता उचलूनही १४ घरकुलांचे काम सुरूच करण्यात आले नाही. या १४ घरकुलांचे स्पष्टीकरण प्रशासनाकडे नाही. याच योजनेंतर्गत २०११-१२ मध्ये दोन हजार ७७१ घरकुले मंजूर झाली. यामध्ये दोन हजार ४१४ लाभार्थ्यांनी पहिल्या हप्त्याची तर दोन हजार ३६९ लाभार्थ्यांनी दुसऱ्या हप्त्याची उचल करून ३५७ घरकुलांचे बांधकामच केले नाही. याच योजनेंतर्गत २०१२-१३ या वर्षात ९५९ घरे मंजूर झाली. त्यातील ८४३ लाभार्थ्यांनी पहिला हप्ता तर ५३८ लाभार्थ्यांनी दुसऱ्या हप्त्याची रक्कम उचलली. ११६ घरकुलाचे बांधकाम सुरूच झाले नाही.
इंदिरा आवास योजनेंतर्गत २०११-१२ मध्ये ४४३ घरकुले मंजूर झाली. यामध्ये ४४० लाभार्थ्यांनी पहिल्या व दुसऱ्या हप्त्याची उचल केली. परंतु तीन घरकुलाचे बांधकाम करण्यात आले नाही. २०१२-१३ मध्ये ६७६ घरकुल मंजूर झाले. यामध्ये ५५७ लाभार्थ्यांनी पहिल्या तर ५१३ लाभार्थ्यांनी दुसऱ्या हप्त्याची उचल केली. मात्र ९९ घरकुलाचे बांधकाम करण्यात आले नाही. २०१३-१४ मध्ये ९५१ घरकुल मंजूर करण्यात आले. यामध्ये ९०० लाभार्थ्यांनी पहिल्या हप्त्याची तर ७५० लाभार्थ्यांनी दुसऱ्या हप्त्याची उचल केली. ५१ घरकुलांचे बांधकाम सुरूच झाले नाही. २०१४-१५ मध्ेय ८४८ घरकुल मंजूर झाले. ६६५ लाभार्थ्यांनी पहिल्या हप्त्याची तर ३६ लाभार्थ्यांनी दुसऱ्या हप्त्याची उचल केली. १८३ घरकुलांचे बांधकाम सुरूच झाले नाही. आदिवासी कोलाम घरकुल योजनेंतर्गत २०११-१२ मध्ये ३१ घरकुले मंजूर करण्यात आली. सहा घरकुलांचे बांधकाम झालेच नाही. राजीव गांधी घरकुल योजनेंतर्गत ४६ घरकुले मंजूर करण्यात आली, त्यापैकी ११ घरकुलांचे बांधकाम झाले नाही. हप्ते उचलूनही बांधकाम सुरू न झालेल्या घरकुलांची संख्या ८४० आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा संशय आहे.