८२४ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कापले
By Admin | Updated: April 3, 2016 03:51 IST2016-04-03T03:51:53+5:302016-04-03T03:51:53+5:30
जीवन प्राधिकरणाने अवैध स्टँडपोज बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासोबतच ज्या ग्राहकांकडे क्षमतेपेक्षा अधिक बिल थकले,

८२४ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कापले
जीवन प्राधिकरणाची कारवाई : अवैध स्टँडपोस्ट बंदचे नगरपरिषदेला पत्र
यवतमाळ : जीवन प्राधिकरणाने अवैध स्टँडपोज बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासोबतच ज्या ग्राहकांकडे क्षमतेपेक्षा अधिक बिल थकले, अशा ८२४ ग्राहकांचे नळ कनेक्शन कापले आहे. जीवन प्राधिकरणाने हाती घेतलेल्या मोहिमेने पाण्याची चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
उन्हाच्या वाढत्या प्रकोपासोबत पाणीटंचाईचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे. या स्थितीत अनेक भागात पाणी चोेरीचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारावर अंकुश बसावा म्हणून प्राधिकरणाने कंबर कसली आहे. यवतमाळ शहरात पाच प्रकरणात पोलिसात अशी तक्रार नोंदविण्यात आली आहे. यामध्ये पाटीपुरा परिसरातील अवैध स्टँडपोज, अंबिकानगर, सेवानगर आणि माळीपुरा परिसरात पाईपलाईन फोडून परस्पर कनेक्शन घेण्याचा प्रकार झाला. या प्रकरणात यवतमाळ शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
जीवन प्राधिकरणाचा ११ कोटींचा पाणी कर थकला आहे. नळाचे बिल न भरणाऱ्या नागरिकांना नळ कनेक्शन कापण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. क्षमतेपेक्षा अधिक बिल असल्याने अनेकांना बिल भरता आले नाही. यवतमाळ शहरात अशा ८२४ ग्राहकांवर नळ कनेक्शन कापण्याची कारवाई करण्यात आली.
यामध्ये २५ हजारापेक्षा कमी नळाच्या पाणी बिलाची थकबाकी असणाऱ्या ५९३ ग्राहकांचे कनेक्शन कापण्यात आले. २५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत पाणी बिलाची थकबाकी असणारे १५६ ग्राहक आहेत. ५० हजारांपासून एक लाखापर्यंत थकबाकी असणारे ४८ ग्राहक, एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या २७ ग्राहकांचे नळ कनेक्शन कापण्यात आले. शासकीय कार्यालयांकडेही पाणी बिलाची मोठी रक्कम थकीत आहे. यासाठीही प्रयत्नाची गरज आहे. (शहर वार्ताहर)