अपघाताचा देखावा करून प्रवाशांचे लुटले ८० हजार
By Admin | Updated: July 3, 2016 02:28 IST2016-07-03T02:28:43+5:302016-07-03T02:28:43+5:30
स्थळ अमरावती मार्गावरील रेणुकापूर फाटा. वेळ सकाळी ११.३० ची. दोघेजण अपघात झाल्यासारखे रस्त्यावर निपचित पडून होते.

अपघाताचा देखावा करून प्रवाशांचे लुटले ८० हजार
रेणुकापूरची घटना : मदत करणाऱ्यांची बॅग पळविली
नेर : स्थळ अमरावती मार्गावरील रेणुकापूर फाटा. वेळ सकाळी ११.३० ची. दोघेजण अपघात झाल्यासारखे रस्त्यावर निपचित पडून होते. याच मार्गावर इंडिका कार आली. अपघाताचे दृश्य पाहून कार थांबली. मदतीसाठी दोघेजण खाली उतरले. त्याचवेळी अपघाताचा देखावा करून पडून असलेले दोघे उभे झाले आणि पापणी लवते न लवते तोच शस्त्राने वार करून कारमधून ८० हजार रुपये असलेली बॅग पळविली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आता अपघातग्रस्तांना मदत कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला.
दिग्रसच्या मोतीनगरातील मो.राजीक मो.रोशन यांच्याशी घडलेला हा प्रकार आहे. इंडिकाने प्रवास करत असताना त्यांना दोनजण रस्त्यावर पडून आढळले. त्यांना मदतीच्या दृष्टीने मो.राजीक आणि त्यांच्यासोबत असलेले एकजण खाली उतरले. काही कळायच्या आत रस्त्यावर पडून असलेले दोघे ताडकन उभे झाले. त्यांनी शस्त्रही वापरले. यात मदत करणारेच जखमी झाले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांच्या कारमध्ये असलेली ८० हजार रुपयांची बॅग या अज्ञात दोघांनी लांबविली. (तालुका प्रतिनिधी)