७१ संचालकांकडे ८० लाख थकीत
By Admin | Updated: November 13, 2014 23:09 IST2014-11-13T23:09:58+5:302014-11-13T23:09:58+5:30
तालुक्यातील ग्रामविविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या ७१ संचालकांकडे तब्बल ८० लाख रुपयांची थकबाकी आहे. बँकेने दिलेल्या कर्ज वारंवार मागणी करूनही आणि सवलती देऊनही भरण्यात आले नाही.

७१ संचालकांकडे ८० लाख थकीत
महागाव : तालुक्यातील ग्रामविविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या ७१ संचालकांकडे तब्बल ८० लाख रुपयांची थकबाकी आहे. बँकेने दिलेल्या कर्ज वारंवार मागणी करूनही आणि सवलती देऊनही भरण्यात आले नाही. आता सेवा सोसायट्यांची निवडणूक होणार असून यात थकबाकीदार संचालक अपात्र ठरणार आहे. त्यामुळे ही मंडळी मतदानापासून वंचित राहण्याची भीती आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पाया म्हणून विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळाकडे बघितले जाते. परंतु हा पायाच मुळात खिळखिळा झाला आहे. तालुक्यातील २८ विविध कार्यकारी सहकारी संस्थांपैकी १५ संस्थेचे ७१ संचालक थकबाकीदार आहेत. संबंधित संचालकांना यापूर्वी कलम ७३ नुसार नोटीस बजावण्यात आली. परंतु हे संचालक जिल्हा बँकेचे मतदार असल्याने बँक आणि सहायक निबंधक कार्यालय ठोस कारवाई करायला कचरत आहे. १० नोव्हेंबर रोजी थकीत संचालकांना पुसद येथील सहायक निबंधक कार्यालयात सुनावणीसाठी बोलाविण्यात आले होते.
थकीत संचालकांवर कार्यवाही करण्यासाठी कलम १९ अंतर्गत नोटीस बजावली असून वसुलीच्या कार्यवाहीकरिता त्यांच्या मालमत्तेवर आरआरसी ओपन करण्यात आल्याची माहिती तालुका सहकार निवडणूक अधिकारी सचिन कुळमेथे यांनी केली. थकीत संचालकांवर कारवाई प्रस्तावित असल्याने त्यांना आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाग घेता येणार नाही. मतदानाचा अधिकारी सहा वर्षाकरिता हिरावला जाणार आहे.
महागाव तालुक्यातील हुडी सोसायटीचे नऊ संचालक थकीत आहे. त्यांच्याकडे आठ लाख ३० हजार थकबाकी आहे.
पोखरीच्या सहा संचालकांकडे सहा लाख ५७ हजार, हिवराच्या पाच संचालकांकडे सहा लाख आठ हजार, पेढीच्या पाच संचालकांकडे एक लाख ६७ हजार, कान्हाच्या पाच संचालकांकडे दोन लाख ६० हजार रुपये, मुडाणाच्या पाच संचालकांकडे नऊ लाख ८६ हजार, शिरपूरच्या पाच संचालकांकडे सात लाख तीन हजार, काळीच्या चार संचालकांकडे आठ लाख, पोहंडूळच्या चार संचालकांकडे आठ लाख ६० हजार, मोरथच्या चार संचालकांकडे तीन लाख ३० हजार, सवनाच्या चार संचालकांकडे दोन लाख ६४ हजार, माळकिन्हीच्या चार संचालकांकडे तीन लाख ९४ हजार, साईच्या चार संचालकांकडे चार लाख ७९ हजार, वरुडच्या तीन संचालकांकडे दोन लाख ८० हजार, चिलगव्हाणच्या तीन संचालकांकडे ९३ हजार, अंबोडाच्या एका संचालकाकडे ६० हजार रुपये थकीत आहे.
महागाव, शिरपूर, चिलगव्हाण, लेवा, धनोडा, गुंज, कान्हा, माळेगाव, आमणी आणि माळकिन्ही सोसायटीची मुदत संपली आहे. संचालक थकीत असल्याने त्यांची नावे मतदार यादीत येणार नाही. याद्याचे काम सुरू झाले असून येत्या डिसेंबरमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहे. या सर्व थकीत संचालकांवर कारवाई होणार असल्याने त्याचा परिणाम जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर दिसणार आहे. (शहर प्रतिनिधी)