२८४७ जागांसाठी तब्बल ७६२६ उमेदवार मैदानात
By Admin | Updated: April 14, 2015 01:46 IST2015-04-14T01:46:37+5:302015-04-14T01:46:37+5:30
जिल्ह्यातील ग्रामपचांयत निवडणुकीच्या मैदानात दोन हजार ८४७ जागांसाठी तब्बल सात हजार ६२६ उमेदवार

२८४७ जागांसाठी तब्बल ७६२६ उमेदवार मैदानात
ग्रामपंचायत निवडणूक : अडीच हजार उमेदवारांची माघार
यवतमाळ : जिल्ह्यातील ग्रामपचांयत निवडणुकीच्या मैदानात दोन हजार ८४७ जागांसाठी तब्बल सात हजार ६२६ उमेदवार रिंगणात असून निवडणुकीची रणधुमाळी गावागावात चरण सीमेला पोहोचली आहे. जिल्ह्यातील ४३४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि पाच ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीने वातावरण ढवळून निघाले असून गावागावात आता एकच चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतीची निवडणूक २२ एप्रिल रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४० ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध झाली. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १० हजार ७०६ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी दोन हजार ६५१ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. आता दोन हजार ८४७ जागांसाठी सात हजार ६२६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. निवडणुकीने ग्रामीण वातावरण ढवळून निघाले असून गावागावांत निवडणुकीचीच मोर्चेबांधणी सुरू आहे. (शहर वार्ताहर)
उमेदवारी अर्जच न भरल्याने ५७ ग्रामपंचायतींचा पेच
जिल्ह्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार होत्या. त्यातील १९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका अविरोध झाल्या. तर ५७ ग्रामपंचायतींमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारच पुढे आले नाही. त्यामुळे या ठिकाणच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या. त्यामध्ये यवतमाळ तालुक्यातील चांदापूर, वाटखेड, बोरगाव आणि चापडोहच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. पुसद तालुक्यातील सावंगी, वालतूर, खैरखेडा या गावांचाही समावेश आहे. तर मारेगाव, झरी, घाटंजी, उमरखेड तालुक्यातही पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्जच आले नाही. वणी तालुक्यातील शेवाळा, चिंचोली, नवरगाव, परसोडा येथेही अशी स्थिती आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणुका होणार नाही.
४० ग्रामपंचायती अविरोध
जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायती अविरोध झाल्या आहे. यात सर्वाधिक पुसद तालुक्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पाच तालुक्यातील एकही ग्रामपंचायत अविरोध झाली नाही. नामांकन परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी ४० गावातील नागरिकांनी सामंजस्याचा परिचय घेत ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करण्याला हिरवी झेंडी दिली.