७६ उमेदवारांना डिपॉझिट जप्तीचा धोका
By Admin | Updated: October 16, 2014 23:30 IST2014-10-16T23:30:16+5:302014-10-16T23:30:16+5:30
झालेल्या एकूण मतदानाच्या सहापटीपेक्षा कमी मतदान मिळविणाऱ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्यात येते. अशा उमेदवारांची जिल्ह्यातील संख्या ७६ च्या घरात जाण्याचा अंदाज आहे.

७६ उमेदवारांना डिपॉझिट जप्तीचा धोका
यवतमाळ : झालेल्या एकूण मतदानाच्या सहापटीपेक्षा कमी मतदान मिळविणाऱ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्यात येते. अशा उमेदवारांची जिल्ह्यातील संख्या ७६ च्या घरात जाण्याचा अंदाज आहे.
एका विधानसभा क्षेत्रात तीन प्रमुख राष्ट्रीय पक्ष आणि तीन प्रादेशिक पक्ष रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवारही रिंंंंगणात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात मतविभाजन होत आहे. त्यातुन एक शष्टांश मते मिळविण्यासाठी प्रमुख पक्षांच्याच तोंडाला फेस आला आहे. यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये ५८ टक्के अर्थात दोन लाख एक हजार ४७४ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे डिपॉझिट वाचविण्यासाठी किमान ३३ हजार ५७९ मते लागणार आहेत. या खाली मतदान असणाऱ्याचे डिपॉझिट जप्त होईल. या मतदार संघात २२ उमेदवार रिंंंगणात आहे. पंचरंगी लढतीत मतदान विभागले जाईल आणि १८ ते १९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याचा धोका आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात एक लाख ९५ हजार २३३ मतदारांनी मतदान केले. एकूण मतदारांच्या ७२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नियमानुसार डिपॉझिट वाचविण्यासाठी एका उमेदवाराला किमान ३२ हजार मत मिळवावे लागतील. या ठिकाणच्या पंचरंगी लढतीत इतर उमेदवारांना हा आकडा गाठतांना दमछाक होणार आहे. विजयाकडे आगेकुच करणाऱ्या उमेदवाराखेरीज इतर उमेदवारांची मते ३२ हजारांवर असतील तर डिपॉझिट वाचेल. इतर उमेद्वारांवर डिपॉझिट जप्तीचे गंडांतर येणार आहे. या ठिकाणी १३ उमेदवार रिंंंगणात आहेत. आठ उमेदवारांना डिपॉझिट जप्तीचा धोका आहे. राळेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ८१ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे ३० हजार २८१ मतांवर मते मिळविणाऱ्या मतदाराला डिपॉझिट वाचविता येणार आहे. सहा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याचा धोका आहे.
दिग्रस विधानसभा क्षेत्रामध्ये दोन लाख ८५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी एक शष्टांश नियमानुसार ३३ हजार ४७५ पेक्षा कमी मतदान मिळविणाऱ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. नऊ उमेदवारांना डिपॉझिट जप्तीचा धोका आहे.
आर्णी विधानसभा क्षेत्रात एक लाख ९८ हजार ५५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी ११ उमेदवार रिंंंंगणात उभे आहेत. ३३ हजार ९२ मतांपेक्षा कमी मतदान मिळाविणाऱ्या सात उमेदवारांवर डिपॉझिट जप्तीचा धोका आहे. पुसद विधानसभा क्षेत्रात एक लाख ७२ हजार ३८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी २८ हजार ३७१ मतदारांपेक्षा कमी मतदान मिळविणाऱ्या उमेदवारांना डिपॉझिट जप्तीचा सामना करावा लागणार आहे.
उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ८६ हजार ८९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी ३१ हजार १४८ मतापेक्षा कमी मतदान मिळविणाऱ्या उमेदवारांना डिपॉझिट जप्तीला समोर जावे लागणार आहे. (शहर वार्ताहर)