अन्नदानासाठी ७५ वर्षीय साधू मागतो परिसरात भिक्षा
By Admin | Updated: November 11, 2015 01:42 IST2015-11-11T01:42:36+5:302015-11-11T01:42:36+5:30
अनेक भोंदू साधू भोळ्या जनतेची फसवणूक करून स्वार्थ साधतात. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून परिसरात भिक्षा मागून मिळालेल्या ...

अन्नदानासाठी ७५ वर्षीय साधू मागतो परिसरात भिक्षा
साधूची कमाल : मुकुटबन परिसरात चर्चेचा विषय
मुकुटबन : अनेक भोंदू साधू भोळ्या जनतेची फसवणूक करून स्वार्थ साधतात. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून परिसरात भिक्षा मागून मिळालेल्या पैशातून एखाद्या मंदिराला अन्नदानासाठी पैसे व मिळालेले धान्य दान करणारा साधू बघून सर्वच आश्चर्यचकित होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील कुंडलिक आडकू गेडाम (७५) असे त्या साधूचे नाव आहे. ते साईबाबाचा गणवेश परिधान करून वयाच्या २० व्या वर्षांपासून घरावर तुळशीपत्र ठेवून जगाचा उद्धार व्हावा व दीन-दुबळ्यांना न्याय मिळावा, गोरगरिब जनता सुखी व्हावी, अडल्यानडल्यांची कामे व्हावी, भुकेल्यांना अन्न मिळावे, कर्म करून परब्रह्म करावा, हा उद्देश सफल करण्यासाठी गावोगावी भीक्षा मागतात. भिक्षेत कुणी दिलेले धान्य व मिळालेल्या पैशातून गोळा झालेली रक्कम एकत्र करून ते एखाद्या मंदिरला दान करतात. त्यातून ते अन्नदान करण्याचा आग्रह धरतात.
त्यांनी नागपंचमीला परिसरातील भेंडाळा येथे मंदिरात अन्नदान केले. त्याचप्रमाणे येथील शबरी माता मंदिरातसुद्धा दोनदा अन्नदानाचा कार्यक्रम घेतला आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यात भटकंती करून अनेक मंदिरात अन्नदान केल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. रस्त्यावरील भुकेल्यांना, वेडसर व्यक्तींना, भिकारी, आजाराने ग्रस्त असलेल्यांना त्यांनी अनेकदा याच भीक्षेतून पैसे दिल्याचे सांगितले. त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. कुणी त्यांना ‘साधूसंत येती घरा-तोची दिवाळी दसरा’, या म्हणीप्रमाणे प्रेमापोटी भोजनासाठी आमंत्रित करतात. कुणाला अपशब्द न बोलता ‘दिया सो दाता, नही दिया सो बी दाता’, असे म्हणून ते पुढील रस्ता धरतात. शरीर साथ देईपर्यंत ही सेवा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मी कोणत्याही समाजाचा द्वेष केला नसून सर्वधर्म समभाव’ या उक्तीप्रमाणे कार्य सुरू राहणार असल्यााचे त्यांनी स्पष्ट केले. (शहर प्रतिनिधी)