वणी उपविभागात ७५ टक्के मतदान
By Admin | Updated: July 26, 2015 02:24 IST2015-07-26T02:24:00+5:302015-07-26T02:24:00+5:30
वणी, पांढरकवडा, मारेगाव आणि झरी तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात शनिवारी ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले.

वणी उपविभागात ७५ टक्के मतदान
उमेदवारांचे भाग्य मशीनबंद : चिखली येथे मतदान यंत्रात बिघाड, पोलिसांसह राज्य राखीव दलाचा चोख बंदोबस्त
वणी : वणी, पांढरकवडा, मारेगाव आणि झरी तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात शनिवारी ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. या चारही तालुक्यात प्राथमिक अंदाजानुसार जवळपास ७५ टक्केच्यावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आता सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वणी तालुक्यात तब्बल ६४४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सोबतच पोटनिवडणुकीसाठी १९ उमेदवार होते. शनिवारी सकाळपासूनच सर्व मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी झाली होती. मतदार रांगेने केंद्रात उभे होते. सध्या शेती कामाचे दिवस असल्याने मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रावर गर्दी केली होती. सकाळी ११ वाजतानंतर गर्दी थोडी ओसरली होती. त्यानतंर पुन्हा सायंकाळी ४ वाजतानंतर गर्दी उसळली होती. सायंकाळपर्यंत सुरळीत मतदान सुरू होते. मतदानाची निश्चित टक्केवारी मात्र अद्याप कळू शकली नाही.
वणी तालुक्यातील वांजरी, येनक, झोला, वडगाव (टीप), टाकळी, शेलू (खु.), शिवणी (जहा.), साखरा (कोलगाव), परमडोह, निंबाळा (बु.), नेरड (पुरड), निळापूर, नांदेपेरा, मुंगोली, मोहदा, कोलगाव, कोना, कुर्ली, कळमना (खु.), गोवारी (कोना), ढाकोरी (बोरी), बोरगाव (मेंढोली), चनाखा, चिखली, राजूर (कॉलरी), बाबापूर, तेजापूर, पळसोनी, पठारपूर, निंबाळा (रोड), माथोली, मजरा, कुंड्रा, खांदला, कोलेरा, कृष्णानपूर, गोवारी (पार्डी), डोर्ली, भांदेवाडा, भुरकी, बोरी व चिलई या ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान पार पडले. या निवडणुकीतून ३१८ उमेदवार निवडून द्यावयाचे होते. त्यात १३८ पुरूष व १८० महिलांचा समावेश राहणार आहे.
तालुक्यात राजूर (कॉलरी), नांदेपेरा, पठारपूर येथील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. पठारपूर हे माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांचे मूळ गाव आहे. त्यामुळे तेथील निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचेच लक्ष लागून आहे.
पांढरकवडा तालुक्यात शांततेत झाले मतदान
पांढरकवडा तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात १० ग्रामपंचायतींसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. तालुक्यात पाटणबोरी ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. तेथे सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. अनेकांना बराच वेळ ताटकळत राहवे लागले. तालुक्यात दोन ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध झाली. शनिवारी ८० जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात २०१ उमेदवारांचे राजकीय भविष्य आता मतदान यंत्रात बंद झाले आहे. पाटणबोरी सोबतच उमरी रोड येथील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
मारेगाव तालुक्यात ७९ टक्के
मारेगाव तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी जवळपास ७९ टक्के मतदान झाले. मतदारांनी सकाळी मतदान केंद्रावर गर्दी केली होती.
आकापूर, दांडगाव, हिवरा-मजरा, कोलगाव, टाकळखेडा, मांगरूळ, टाकळी, कुंभा, करणवाडी येथे शांततेत मतदान पार पडले. २८ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. कुंभा येथील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून तेथील निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मतदानासाठी तब्बल १२-१५ वर्षांपासून बाहेरगावी असलेल्या मतदारांनाही आणण्यात आले होते.
झरी तालुक्यात मुकुटबनमध्ये चुरस
झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथे ८१ टक्केच्यावर मतदान झाले. तेथे अत्यंत चुरशीची लढत आहे. उमेदवार आणि त्यांचे समर्थक प्रत्येक मतदाराला केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी धडपड करीत होते. झरी तालुक्यात २३ ग्रामपंचायतींसाठी मतदान शांततेत पार पडले. झरी तालुक्यात जवळपास ७७ टक्केच्यावर मतदान झाले. (कार्यालय प्रतिनिधी)