नगरपंचायतीसाठी ७४.२७ टक्के मतदान
By Admin | Updated: November 2, 2015 01:57 IST2015-11-02T01:57:29+5:302015-11-02T01:57:29+5:30
जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले असून जिल्ह्यात सरासरी ७४.२७ टक्के मतदान झाले.

नगरपंचायतीसाठी ७४.२७ टक्के मतदान
भाग्य मशीनबंद : झरीत सर्वाधिक ८७.३३
यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले असून जिल्ह्यात सरासरी ७४.२७ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान आदिवासीबहुल झरी येथे ८७.३३ टक्के झाले. १०२ जागांसाठी ५८२ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले. मतदानाची मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसत होती.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, कळंब, झरी जामणी, बाभूळगाव, राळेगाव आणि मारेगाव नगरपंचायतीसाठी रविवारी मतदान पार पडले. सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला. दुपारी १.३० वाजेपर्यंत सहाही ठिकाणी सरासरी ४८.८६ टक्के तर दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६३.४२ टक्के मतदान झाले होते. सहा नगरपंचायतीत ४३ हजार ३३१ मतदार होते. त्यात पुरुष २२ हजार १४३ तर महिला २१ हजार १८८ मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी ३२ हजार १८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष १६ हजार ५४३ तर महिला १५ हजार ६४० मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात मतदानादरम्यान कुठेही अनूचित प्रकार घडला नाही. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले.
आदिवासीबहुल झरी नगरपंचायतीच्या १६ जागांसाठी मतदान झाले. ९६३ मतदारांपैकी ८४१ म्हणजे ८७.३३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महागाव येथे १७ जागांसाठी ६ हजार ५०० मतदारांंपैकी ४ हजार ९६३ म्हणजे ७६.३५ टक्के, कळंब येथे १२ हजार ९२४ मतदारांपैकी ९ हजार ५३७ म्हणजे ७३.७९ टक्के, बाभूळगाव येथे चार हजार ९९९ मतदारांपैकी ३५ हजार ५७९ म्हणजे ७१.५९, राळेगाव ११ हजार ८६८ मतदारांपैकी ८ हजार ७७७ म्हणजे ७३.९६ आणि मारेगाव येथे ६ हजार ७७ मतदारांपैकी ४ हजार ४८६ म्हणजे ७३.८२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्व मतदान केंद्रावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (शहर वार्ताहर)