आयुर्वेदच्या आंदोलनाचा ७२ वा दिवस
By Admin | Updated: October 17, 2016 01:45 IST2016-10-17T01:45:32+5:302016-10-17T01:45:32+5:30
येथील आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील १२५ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी तब्बल ७२ दिवसांपासून आंदोलनोच शस्त्र उपसले आहे.

आयुर्वेदच्या आंदोलनाचा ७२ वा दिवस
विद्यार्थी वाऱ्यावर : १२५ कर्मचारी बेमुदत उपोषणावर
पुसद : येथील आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील १२५ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी तब्बल ७२ दिवसांपासून आंदोलनोच शस्त्र उपसले आहे. मात्र व्यवस्थापनाने अद्यापही दखल घेतली नाही.
पुसदसारख्या डोंगराळ व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे तसेच ग्रामीण रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने पुसद येथील गजानन महाराज संस्थानद्वारा संचालित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाची स्थापना १७ आॅगस्ट १९९२ रोजी माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी केली. प्रारंभीचे काही दिवस महाविद्यालयाची प्रगती झाली. येथून दरवर्षी ५० विद्यार्थी बीएएमएसची पदवी घेऊन बाहेर पडतात. मात्र मागील काही वर्षांपासून येथील व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार वाढल्याचे चित्र आहे. येथे १२५ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असून मागील २५ वर्षांपासून या महाविद्यालयात अनेक समस्यांचा डोंगर असून कर्मचाऱ्यांना तुटपुंजे वेतन दिले जाते. कर्मचाऱ्यांचे मार्च २०१४ ते आॅगस्ट २०१४ असे सहा महिन्यांचे वेतन थकीत असून एप्रिल २०१६ पासून सप्टेंबर २०१६ असे सहा महिन्याचे वेतन देण्यात आले नाही. येथील कर्मचाऱ्यांना पाचवा वेतन आयोग अपूर्ण दिला असून सहावा आयोग लागूच केला नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तर २०१० पासून पगारातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली गेली नाही. त्यामुळे अनेकांच्या पॉलिसी लॅप्स झाल्यात. बँकांचे कर्जाचे हप्ते थकीत आहेत. येथील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
परिणामी सर्व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाविरुद्ध एल्गार पुकारला असून ४ आॅगस्ट रोजी काळ्याफिती लावून निषेध नोंदवून ५ आॅगस्टपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. येथील कर्मचारी उपाशी तर अध्यक्ष व प्राचार्य तुपाशी असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. आमदार मनोहरराव नाईक, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, उपविभागीय अधिकारी, नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार डॉ. संजय गरकल आदींनी पुढाकार घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आहे. आता या कर्मचाऱ्यांचा प्रश्न व्यवस्थापन कसा सोडविते याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)