नगरपंचायतीसाठी ७२१ अर्ज
By Admin | Updated: October 9, 2015 00:10 IST2015-10-09T00:10:48+5:302015-10-09T00:10:48+5:30
जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी ७२१ उमेदवारांनी नामांकन दाखल केले असून अखेरच्या दिवशी नामांकन दाखल करण्यासाठी एकच गर्दी झाली होती.

नगरपंचायतीसाठी ७२१ अर्ज
अखेरच्या दिवशी प्रचंड गर्दी : शक्तिप्रदर्शन करीत भरले नामांकन अर्ज
यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी ७२१ उमेदवारांनी नामांकन दाखल केले असून अखेरच्या दिवशी नामांकन दाखल करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. सर्वाधिक १८० नामांकन राळेगावात तर सर्वात कमी ७४ नामांकन झरी जामणी नगरपंचायतीसाठी दाखल झाले आहे. नामांकन दाखल करताना सहाही ठिकाणी उमेदवारांनी आपले शक्तीप्रदर्शन केले.
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव, झरी, महागाव, बाभूळगाव, कळंब, राळेगाव नगरपंचायतीची निवडणूक १ नोव्हेंबर रोजी होत आहे. त्यासाठी नामांकन दाखल करण्याची गुरुवार ८ आॅक्टोबर ही अंतिम तारीख होती. शेवटच्या दिवशी नामांकन दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. मारेगाव नगरपंचायतीसाठी १४५ नामांकन दाखल झाले असून झरी ७४, महागाव १३७, बाभूळगाव ८०, कळंब १०५, राळेगाव १८० असे ७२१ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. अखेरच्या दिवशी गुरुवारी तब्बल ४०९ उमेदवारांनी नामांकन दाखल केले.
नामांकन दाखल करण्याला १ आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी जिल्ह्यात कुठेही नामांकन दाखल झाले नाही. ३ आॅक्टोबर रोजी राळेगाव येथे चार आणि ५ आॅक्टोबर रोजी दोन नामांकन दाखल झाले होते. ६ आॅक्टोबर रोजी मारेगाव दोन, झरी, महागाव, बाभूळगाव, कळंब येथे प्रत्येकी एक तर राळेगावात १७ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. बुधवारी मारेगाव येथे ६६, झरी १७, महागाव ३७, बाभूळगाव २७, कळंब ५३, राळेगाव ७२ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. तर गुरुवारी अखेरच्या दिवशी मारेगाव ६६, झरी ५६, महागाव ९९, बाभूळगाव ५२, कळंब ५१ आणि राळेगावात ८५ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. ७२१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. ९ आॅक्टोबर रोजी नामानिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे.
नगरपंचायत निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले असून विधान परिषदेवर डोळा ठेऊन सर्वच पक्षाचे दिग्गज नेते या निवडणुकीत उतरले आहे. त्यामुळे आता रिंगणात कोण राहतो आणि कुणाचे वर्चस्व निर्माण होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
तत्काळ मुलाखती अन् नामांकनही दाखल
बाभूळगाव : येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना आणि बहुजन समाजपार्टीच्या उमेदवारांच्या मुलाखती गुरुवारीच पार पडल्या आणि तेव्हाच उमेदवारांनी नामांकन दाखल केले. यावेळी माजी आमदार वसंतराव पुरके, विजयाताई धोटे, शिवसेना खासदार भावनाताई गवळी, आमदार प्रा.डॉ.अशोक उईके, राजेंद्र डांगे, आमदार ख्वाजा बेग, आमदार संदीप बाजोरिया, बसपाचे तारिक लोखंडवाला यांनी आपआपल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन उमेदवार निश्चित केले. बाभूळगाव सारखीच स्थिती जिल्ह्यातील पाचही नगरपंचायतीत दिसून आली. कालपर्यंत कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवाराची यादी जाहीर केली नव्हती. शेवटच्या दिवशी मुलाखती घेऊन नावे निश्चित करीत नामांकन दाखल केले. मात्र यातील कोण उमेदवारी मागे घेतो आणि अखेर कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)