७०० गावे टंचाईच्या सावटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:42 IST2018-12-24T21:41:45+5:302018-12-24T21:42:17+5:30
यावर्षी अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ७०० गावांवर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. प्रशासनाने साडेचार कोटींचा कृती आराखडा तयार केला असला तरी उपाययोजना कागदावरच दिसत आहे.

७०० गावे टंचाईच्या सावटात
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यावर्षी अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ७०० गावांवर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. प्रशासनाने साडेचार कोटींचा कृती आराखडा तयार केला असला तरी उपाययोजना कागदावरच दिसत आहे.
यावर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात शासनाने दुष्काळ सदृश परिस्थितीही घोषित केली. अपुºया पावसामुळे यावर्षी पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. जलयुक्तशिवार आणि वॉटर कप स्पर्धा राबवूनही अनेक गावे तहानलेली आहे. येत्या उन्हाळ्यात अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे. जून २०१९ अखेरपर्यंत सुमारे ७०० गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचण्याची शक्यता आहे. या गावांमध्ये विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. त्याला जिल्हाधिकाºयांनी मंजुरीही दिली आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान सुमारे २६९ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत आहे. याशिवाय एप्रिल ते जूनपर्यंत आणखी ४३१ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हाभरात तब्बल ६६४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करावे लागणार आहे. सोबतच ८९ ठिकाणी टँकर अथवा बैलबंडीद्वारे पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी चार कोटी ४७ लाख ६२ हजारांचा खर्च अपेक्षित आहे.
मागील वर्षीच्या अनेक योजना रखडल्या
गेल्या वर्षी पाणीपुरवठ्यासाठी विविध योजनांचा शुभारंभ करण्यात आला. मात्र अनेक ठिकाणच्या योजना रखडल्या आहे. काही गावांमध्ये निधीअभावी योजना ठप्प पडल्या आहेत. काही गावांमध्ये गाव समितीच्या वादातून योजना रखडल्या आहे. अनेक ठिकाणी पाईपही पोहोचले नाही. काही ठिकाणी विंधन विहिरी खोदूनही पाणी लागले नाही. त्याऐवजी दुसºया ठिकाणी विंधन विहीर केली गेली नाही. यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.