६८० विद्यार्थ्यांना मिळाला राखीव जागेवर प्रवेश

By Admin | Updated: July 8, 2016 02:27 IST2016-07-08T02:27:11+5:302016-07-08T02:27:11+5:30

आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील ६८० विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात आला आहे.

680 students get admission in reserved seats | ६८० विद्यार्थ्यांना मिळाला राखीव जागेवर प्रवेश

६८० विद्यार्थ्यांना मिळाला राखीव जागेवर प्रवेश

शिक्षण विभाग : आॅनलाईन सोडतीसाठी आज दुसरी फेरी, दुर्बल घटकातील पालकांना दिलासा
यवतमाळ : आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील ६८० विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात आला आहे. शिक्षण विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आॅनलाईन सोडतीमधून हे प्रवेश देण्यात आले. मात्र, अद्यापही काही विद्यार्थी वंचित असण्याची शक्यता लक्षात घेऊन शुक्रवारी आॅनलाईन सोडतीची दुसरी फेरी घेण्यात येणार आहे.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांच्या मुलांना बरेच वेळा अपेक्षित शाळेत शिक्षण घेणे अशक्य होते. शाळांच्या भरमसाट शुल्कामुळे होतकरू विद्यार्थ्यांना दूरच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेता आरटीईमध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी खास तरतूद करण्यात आली. महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार, दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात.
जिल्ह्यात यंदा ही प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन राबविण्यात येत आहे. आरटीई अंतर्गत राखीव जागांच्या प्रवेशाकरिता जिल्ह्यातील १७९ शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंद केली. त्यासाठी जिल्हा परिषदेने पालकांना केलेल्या आवाहनानुसार पालकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी केली. १४ जून रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात अशा सर्व पालकांना बोलावून आॅनलाईन ड्रॉ काढण्यात आला. ही सोडत काढताना जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या प्रक्रियेतून जिल्ह्यातील ६८० दुर्लब घटकातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी १ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार या विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतले आहेत.
दरम्यान, सदर प्रक्रियेमध्ये एकूण १७९ शाळांपैकी ५६ शाळांमध्ये राखीव जागांच्या संख्येपेक्षा अधिक अर्ज शिक्षण विभागाकडे आले होते. त्यामुळे पहिल्या फेरीमध्ये निवड न होऊ शकलेल्या बालकांसाठी दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. एनआयसी पुणेकडून पहिल्या सोडतीच्या वेळेस पालकांनी काढलेल्या अंकाच्या आधारे सिस्टीमद्वारे आॅनलाईन स्वयंचलित दुसरी सोडत ८ जुलै रोजी दुसरी सोडत काढण्यात येणार आहे. दुसऱ्या सोडतीमध्ये निवड झालेल्या किंवा न झालेल्या सर्वच पालकांना संगणक प्रणालीद्वारे एसएमएस प्राप्त होणार आहे. सोडतीमध्ये काय झाले, आपल्या पाल्याची निवड झाली किंवा नाही आदी माहिती या एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. निवड झालेल्या पालकांनी मूळ दस्तावेजांसह ९ जुलै ते १५ जुलैपर्यंत निवड झालेल्या शाळेत जाऊन प्रवेश घ्यावे, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. आरटीईमुळे दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश शक्य झाले. (स्थानिक प्रतिनिधी)

पहिल्यांदाच आॅनलाईन प्रक्रियेमुळे पारदर्शकता
आरटीईअंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशाची तरतूद आहे. मात्र, दरवर्षी या प्रवेशाच्या बाबतीत वाद निर्माण होतात. कधी संस्था चालकांकडून तर कधी शासनाकडून असहकाराची भूमिका घेतली गेली. संस्था चालकांच्या मर्जीतील लोकांनाच मोफत जागांचा लाभ दिला जातो, अशीही शंका घेतली गेली. मात्र, यंदा घोळ टाळण्यासाठी २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता शिक्षण विभागाने आॅनलाईन प्रक्रिया राबविली. शाळांनी आणि इच्छूक पालकांनीही आॅनलाईन नोंदणी केली. प्रवेशाचा ड्रॉ देखील आॅनलाईन काढण्यात आला. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया पारदर्शकपणे होत आहे.

Web Title: 680 students get admission in reserved seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.