67 scientists come forward for development of Vidarbha | विदर्भाच्या विकासासाठी सरसावले ६७ शास्त्रज्ञ
विदर्भाच्या विकासासाठी सरसावले ६७ शास्त्रज्ञ

ठळक मुद्देपहिल्यांदाच अराजकीय मोहीम आयआयटी, आयआयएसईआर स्थापनेसाठी उच्च शिक्षितांचा वाढता प्रतिसाद

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विदर्भाच्या विकासासाठी विदर्भ वेगळा कराच, ही मागणी दरवेळच्या निवडणुकीपूर्वी बुलंद होते. पण यावेळी पहिल्यांदाच राजकीय अभिनिवेश नसलेल्या उच्च शिक्षितांनी आगळीवेगळी मोहीम सुरू केली आहे. ही मागणी स्वतंत्र विदर्भाची नसून विदर्भाच्या शैक्षणिक विकासाची आहे. सरकारने या भागात आयआयटी, आयआयएसईआर या संस्था स्थापन कराव्या, अशी मागणी चक्क ६७ शास्त्रज्ञांनी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या मोहिमेला विदर्भातून मोठा प्रतिसादही मिळतो आहे.
विदर्भात जन्मलेले मात्र आता देशाच्या विविध भागात जाऊन उच्च पदांवर काम करणाऱ्या मंडळींनी आपल्या प्रदेशाच्या विकासाच्या इच्छेने ही मोहीम सुरू केली आहे. या मागणीला विदर्भातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून प्रतिसाद मिळविण्यासाठी या शास्त्रज्ञांनी आॅनलाईन पिटीशन तयार केली आहे. या पिटीशनला प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी येथील रहिवासी आणि आता मुंबईच्या टाटा इन्स्टीट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत शास्त्रज्ञ असलेले डॉ. विवेक पोलशेट्टीवार यांनी ही मोहीम सुरू केली आहे. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या राज्यात जर दोन आयआयटी असू शकतात, तर महाराष्ट्रात का नाही, असा सवाल या आॅनलाईन याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. आपापल्या क्षेत्रात उच्च पदस्थ असलेल्या प्रतिभावंत लोकांनी उघडलेल्या या मोहिमेने संपूर्ण विदर्भाचे लक्ष वेधून घेतले आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांना सोपविणार प्रस्ताव
६७ शास्त्रज्ञांनी तयार केलेली ही आॅनलाईन पिटीशन सध्या विदर्भभर व्हायरल झाली असून केवळ तीन दिवसात १४२९ लोकांनी त्यावर आपली मागणी नोंदविली आहे. देशभरात विखुरलेले हे सर्व ६७ शास्त्रज्ञ लवकरच नागपुरात बैठक घेणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. त्यावेळी विदर्भातील लोकांच्या मागणीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला जाईल. 

या प्रतिभावंतांनी उघडली मोहीम
टीआयएफआरचे शास्त्रज्ञ विवेक पोलशेट्टीवार, नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू एस.पी.काणे, सीएसआयआरचे महासंचालक शेखर मांडे, टीआयएफआरचे अध्यक्ष राजीव गवई, एनबीआरआयचे माजी संचालक प्रफुल्लचंद्र साने, मद्रास आयआयटीचे डीन पी.सी.देशमुख,राजेश गोखले, मनमोहन सरीन, मुकुंद गुर्जर, कोलकाता आयआयएसईआरचे संजीव झाडे, दिल्ली आयआयटीचे प्रवीण इंगोले, आशीष दरपे, कानपूर आयआयटीचे हर्षवर्धन वानरे, मुंबई आयआयटीचे ए.आर.कुलकर्णी, हैदराबादचे मंदार देशमुख, आयटीईआरचे संचालक शिशिर देशपांडे, गोरखपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू नामदेव गजभिये, बंगळूरूचे सुरेश देशपांडे, जेएनयू दिल्लीचे मनोज मुंडे, दिल्ली युनिव्हर्सिटीचे धनराज मेश्राम, पुणे आयआयएसईआरचे एन.के. सुभेदार, नागपूर विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभागप्रमुख पी.एम.गाडे, भूगोल विभागप्रमुख अनिल पोफरे, रसायनशास्त्र विभागप्रमुख ज्योत्स्ना मेश्राम, अमरावती विद्यापीठाचे राजेंद्र प्रसाद, हेमंत चांडक, व्हीएनआयटीचे उमेश देशपांडे, सुरेश उमरे, निरीचे नितीन लाभशेटवार, क्रिष्णा खैरनार, अमेरिकेतील सेक्युरिटी आर्किटेक्चरचे संचालक उपेंद्र मार्डीकर, अमेरिकेतील बीकेडी कन्सलटंटचे सीईओ बी. के देशमुख आदी ६७ नामवंतांनी ही मोहीम उघडली आहे.

विदर्भात गुणवत्ता असली, तरी नामवंत शिक्षण संस्थांच्या अभावामुळे त्या प्रतिभेला वाव मिळत नाही. इतर कोणत्याही संस्थांपेक्षा आयआयटी आणि आयआयएसईआरसारख्या संस्थांमुळेच विदर्भात औद्योगिक विकासाला चालना मिळू शकते. त्यासाठीच आम्ही ६७ जणांनी ही मोहीम सुरू केली आहे.
- डॉ. विवेक पोलशेट्टीवार, शास्त्रज्ञ, टीआयएफआर, मुंबई

Web Title: 67 scientists come forward for development of Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.