६६३ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल

By Admin | Updated: March 27, 2015 01:37 IST2015-03-27T01:37:38+5:302015-03-27T01:37:38+5:30

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून पहिल्या टप्प्यातील ६६३ ग्रामपंचायतीची निवडणूक २२ एप्रिल रोजी होत आहे.

663 Gram panchayat election bugle | ६६३ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल

६६३ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल

यवतमाळ : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून पहिल्या टप्प्यातील ६६३ ग्रामपंचायतीची निवडणूक २२ एप्रिल रोजी होत आहे. बुधवार मध्यरात्रीपासून निवडणुकीची आचारसंहिता ग्रामपंचायत क्षेत्रासाठी लागू झाली आहे. सार्वत्रिक निवडणुकीसोबतच जिल्ह्यातील ८१ ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीने ग्रामीण राजकीय वातावरण आता ढवळून निघणार आहे.
लोकसभा, विधानसभेनंतर खऱ्या अर्थाने आता गावपातळीवरच्या मंत्रालयासाठी चढाओढ सुरू आहे. सुरूवातीला मे महिन्यापर्यंत कालावधी संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्याच निवडणुका होतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. आता मात्र आयोगाने मे ते आॅगस्टपर्यंत कालावधी संपणाऱ्या ६६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
यापूर्वी ७ एप्रिल अगोदर प्रशासनाकडून सरपंचाचे आरक्षण जाहीर केले जाणार आहे. या निवडणुकींच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. निवडणूक खर्चासाठी विधानसभेप्रमाणे निकष ठेवण्यात आले आहे. प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र बँक खाते काढून खर्चाचा हिशोब सादर करावा लागणार आहे. नामांकन दाखल करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला ५०० रुपये अनामत अनुसूचित जाती, जमाती आणि नामाप्र प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ग्रामीण भागावर सातत्याने संकटाची मालिका सुरू असताना या निवडणुका लागल्या आहेत.
रोजगार आणि कर्जात बुडालेला शेतकरी या दोन समस्यांवर नव्या सरकारला उपाय सापडलेला नाही. त्यामुळे अतिशय विदारक स्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. सध्या गावपुढाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत असून, शासनाने उमेदवारांकरिता असलेली जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथिल केली आहे. त्यानंतरही अनेक संवर्गातील उमेदवारांजवळ जात प्रमाणपत्रसुद्धा उपलब्ध नाही. त्यामुळे एसडीओ कार्यालयाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: 663 Gram panchayat election bugle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.