६६ लाखांची ताडपत्री खरेदी गाजली
By Admin | Updated: July 13, 2016 03:12 IST2016-07-13T03:12:19+5:302016-07-13T03:12:19+5:30
जिल्हा परिषद कृषी विभागाने खरेदी केलेल्या ताडपत्रीच्या मुद्यावर मंगळवारी स्थायी समितीची सभा चांगलीच गाजली.

६६ लाखांची ताडपत्री खरेदी गाजली
जिल्हा परिषद : कृषी विभागाच्या कारभाराचे स्थायी समितीच्या सभेत चौकशीचे आदेश
यवतमाळ : जिल्हा परिषद कृषी विभागाने खरेदी केलेल्या ताडपत्रीच्या मुद्यावर मंगळवारी स्थायी समितीची सभा चांगलीच गाजली. ६६ लाखांची ताडपत्री खरेदी करताना १३ लाख ९२ हजार रुपयांची अनियमितता झाल्याचा ठपका सदस्यांनी ठेवला आहे. यावरून कृषी विभागाच्या संपूर्ण कामकाजाचीच चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली.
कृषी विकास अधिकारी जगन राठोड वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यांचा प्रभार घाटंजी येथील तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांच्याकडे आहे. स्थायी समितीच्या बैठकीत कृषी विभागातील एसडीपी पाईप खरेदीचा मुद्दा चर्चेला आला. ही खरेदी करण्यासाठी लागणारी समितीच एडीओंनी यांनी गठीत केली नाही. शिवाय एमईआयडीसी यांना पुरवठा आदेश देताना न्युबंस आणि मॅकनव या राज्याबाहेरच्या कंपन्यांची निवड केली. याची चौकशी करण्याचा ठराव समितीने घेतला. त्यानंतर प्रवीण देशमुख यांनी ताडपत्री खरेदीचा मुद्दा पुढे केला. १३ लाख ९२ हजार रुपये अतिरिक्त खर्च केल असून ही रक्कम कोणाकडून वसूल करायची असा प्रश्न प्रवीण देशमुख यांनी केला. कृषी विभागातील विस्तार अधिकारी रवींद्र देशमुख यांनी अद्यापही प्रभार दिला नाही. २४ तासाच्या आत प्रभार दिला नाही तर त्यांच्यावर फौजदारी करण्याचा ठराव समिती घेतला. कृषी विभागातील साहित्य खरेदीच्या अनागोंदीची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या अध्यक्षतेत, उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी यांची समिती गठीत करण्यात आली. (कार्यालय प्रतिनिधी)
शौचालय अनुदानाची चौकशी होणार
घाटंजी तालुक्यातील मुरली येथे शासकीय सेवेत असलेल्या ११ जणांनी शौचालयाचे अुनदान लाटल्याचे गंभीर प्रकरण देवानंद पवार यांनी बैठकीत मांडले. याची तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश अध्यक्ष डॉ. फुपाटे यांनी दिले. त्यासाठी उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडून कोणतीच माहिती वेळेत दिली जात नाही, अशी तक्रार सदस्यांनी केली, यावर अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.