सरासरी ६५ टक्के मतदान
By Admin | Updated: February 17, 2017 02:32 IST2017-02-17T02:32:21+5:302017-02-17T02:32:21+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उमरखेड आणि पुसद उपविभागातील चार तालुक्यात गुरूवारी उत्साहात मतदान पार पडले.

सरासरी ६५ टक्के मतदान
सर्वत्र शांततेत : पुसद, महागाव, दिग्रस आणि उमरखेड येथे प्रचंड उत्साह
पुसद : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उमरखेड आणि पुसद उपविभागातील चार तालुक्यात गुरूवारी उत्साहात मतदान पार पडले. सरासरी ६५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दिग्रस तालुक्यातील कळसा येथील अपवाद वगळत सर्वत मतदान शांततेत पार पडले.
महागाव तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गणासाठी शुक्रवारी अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. तालुक्यातील ९४ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले असून, आता सर्वांना २३ फेब्रुवारीची प्रतीक्षा लागली आहे. कोणदरी येथे मतदान केंद्रावर किरकोळ वाद झाल्याने आठ जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर सकाळी शांततेत मतदानाला प्रारंभ झाला. दुपारी १.३० वाजेपर्यंत ३३.७७ टक्के मतदान झाले होते. ग्रामीण भागात मतदानासाठी रांगा लागल्याचे दिसत होते. सकाळी ९ वाजता वसंतनगर लेवा येथील एक मतदान यंत्र बंद पडले त्यामुळे तासभर मतदान खोळंबले होते. निवडणूक निर्णय अधिकारी विजय भाकरे यांनी तात्काळ दखल घेऊन सुरू केले. बहुतांश उमेदवार आपापल्या मतदारसंघात मतदान केंद्रांना भेटी देत असल्याचे दिसत होते.
कोणदरी येथे मतदानावरून दोन गटात हाणामारी झाली. एकमेकांच्याविरुद्ध तक्रारीवरून आठ जणांविरुद्घ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. शेषराव दीपला राठोड यांच्या तक्रारीवरून आरोपी लहू जयसिंग राठोड, पिंटू जयसिंग राठोड, संतोष मधुकर राठोड, मधुकर रूपसिंग राठोड तर लहु राठोड यांच्या तक्रारीवरून संदीप चंद्रभान राठोड, शेषराव दीपला राठोड, उत्तम बाला राठोड, भिकम बाला राठोड यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. ठाणेदार करीम बेग मिर्झा यांनी तालुक्यात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता.
उमरखेड तालुक्यातील पाच गट आणि दहा गणांसाठी गुरूवारी शांततेत मतदान पार पडले. जिल्हा परिषदेचे २८ आणि पंचायत समितीच्या ४९ अशा ७७ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. तालुक्यातील मुरली, ढाणकी, सोनदाभी, बिटरगाव, निंगणूर, जवराळा याठिकाणी मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा लागून होत्या. त्यामुळे येथे उशिरापर्यंत मतदान घेण्यात आले. या निवडणुकीने ग्रामीण भागात प्रचंड उत्साह दिसून आला. दिग्रस तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या सहा गणांसाठी गुरूवारी मतदान झाले. ८८ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले. तालुक्यात सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. (लोकमत चमू)