४८०० विहिरींसाठी ६० हजार शेतकऱ्यांचे अर्ज ‘वेटिंग’वर
By Admin | Updated: February 19, 2017 00:37 IST2017-02-19T00:37:11+5:302017-02-19T00:37:11+5:30
धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला ४८०० अतिरिक्त विहिरी मंजूर झाल्या. याकरिता जुन्या प्रक्रियेत

४८०० विहिरींसाठी ६० हजार शेतकऱ्यांचे अर्ज ‘वेटिंग’वर
पुन्हा आॅनलाईन भरा अर्ज : जुन्या दोन हजार मंजूर विहिरी रद्द
रूपेश उत्तरवार यवतमाळ
धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला ४८०० अतिरिक्त विहिरी मंजूर झाल्या. याकरिता जुन्या प्रक्रियेत ६० हजार अर्ज आले होते. आता न्यायालयाने ही प्रक्रिया पुन्हा राबविण्याचे आदेश दिल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहे. आचारसंहिता संपताच याची अंमलबजावणी होणार आहे.
आघाडी सरकारच्या काळात विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी ६४ हजार विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानंतर प्रत्येक तालुक्याला ३०० अतिरिक्त वाढीव विहिरींचा लक्ष्यांक देण्यात आला. वाढीव अतिरिक्त विहिरी मिळविण्यासाठी ६० हजारांपेक्षा जास्त अर्ज आले. या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने वाढीव सिंचन विहिरींची प्रक्रिया पारदर्शकतेने राबविण्याचे आदेश दिले. ही प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने राबविण्याच्या सूचना रोजगार हमी योजनेचे उपसचिव डॉ. प्रमोद शिंदे यांनी दिले आहेत. आता निवडणुकांची आचारसंहिता संपताच नव्याने वाढीव सिंचन विहिरीसाठी अर्ज दाखल करण्याच्या कामाला वेग येणार आहे. आठ वर्षापूर्वी वाढीव धडक सिंचन विहिरींचा निर्णय घेण्यात आला होता. याकरिता २००९ मध्ये प्रक्रिया राबविण्यात आली. ३१ जानेवारी २०१७ पर्यंत वाढीव विहिरीचा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना होत्या. मात्र निवडणुका आल्यामुळे वाढीव सिंचन विहिरींच्या कार्यक्रमाला ब्रेक लागला. आचारसंहिता संपताच प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार आहे.