मोघेंच्या आर्णी विधानसभेत भाजपाला ६० हजारांची आघाडी
By Admin | Updated: May 17, 2014 23:52 IST2014-05-17T23:52:50+5:302014-05-17T23:52:50+5:30
आर्णी विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिममध्ये असता तर चित्र वेगळे दिसले असते, असे सांगणार्या शिवाजीराव मोघे यांच्या परंपरागत मतदारसंघातच भाजपाने आघाडी घेतली

मोघेंच्या आर्णी विधानसभेत भाजपाला ६० हजारांची आघाडी
यवतमाळ : आर्णी विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिममध्ये असता तर चित्र वेगळे दिसले असते, असे सांगणार्या शिवाजीराव मोघे यांच्या परंपरागत मतदारसंघातच भाजपाने आघाडी घेतली. थोडीथोडकी नव्हेतर भाजपाच्या उमेदवाराला काँग्रेसपेक्षा तब्बल ५९ हजार ८१४ मते अधिक मिळाली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोघेंना धोक्याची घंटा ठरू शकते. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे तब्बल ९३ हजार ८१६ मतांनी पराभूत झाले. पराभवानंतर आर्णी विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिममध्ये असता तर आपल्याला मिळालेल्या मतांच्या आकड्यात निश्चितच वाढ झाली असती, असे मत शिवाजीराव मोघे यांनी मांडले होते. मात्र आर्णी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला आघाडीच काय जबर फटका बसल्याचे दिसून येते. भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांना एक लाख १० हजार ७४५ तर काँग्रेसचे संजय देवतळे यांना ५० हजार ९३१ मते मिळाली. ५९ हजार ८१४ मताधिक्याने अहीर विजयी झाले. त्यामुळे मोघे यांचा हा दावा सपसेल फेल ठरला, असेच म्हणावे लागेल. आर्णी हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. शिवाजीराव मोघे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आहे. मात्र त्यांचा आपल्या मतदारसंघावर किती प्रभाव आहे, हे या निवडणुकीतून दिसून आले. विशेष म्हणजे आदिवासीबहुल आर्णी मतदारसंघात भाजपाला मिळालेली प्रचंड आघाडी राजकीय विश्लेषकांनाही विचार करायला लावणारी आहे. मोदींची लाट होती, असे सांगत आपल्या पराभवावर पांघरुण घालण्याचा आता प्रयत्न केला जात आहे. मात्र मतदारांनी काँग्रेसला आर्णी विधानसभा क्षेत्रातही का नाकारले, याची कारणमिमांसा कुणीही करताना दिसत नाही. देशात लाट होती. विदर्भात एकही जागा काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळविता आलेली नाही. याच समर्थनावर आपल्या चुकांवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाजीराव मोघे यांनी प्रचारासाठी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांना आर्णी-केळापूरमधून बोलावले होते. त्यामुळे ही मंडळी यवतमाळात तळ ठोकून होती. परिणामी काँग्रेसला आर्णीमध्ये सक्षम कार्यकर्तेच मिळाले नाही आणि भाजपाने या संधीचे सोने केले. (नगर प्रतिनिधी)