कोर्ट-कचेरीवर ६० लाखांची उधळपट्टी

By Admin | Updated: February 4, 2015 23:21 IST2015-02-04T23:21:49+5:302015-02-04T23:21:49+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संचालकांच्या खासगी खटल्यात कोर्ट-कचेरीवर तब्बल ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

60 lakhs extra cash in court | कोर्ट-कचेरीवर ६० लाखांची उधळपट्टी

कोर्ट-कचेरीवर ६० लाखांची उधळपट्टी

जिल्हा बँक : आठ संचालकांचे खासगी खटले, सहकार मंत्र्यांकडे सुनावणी
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संचालकांच्या खासगी खटल्यात कोर्ट-कचेरीवर तब्बल ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात थेट सहकार मंत्र्यांकडे सुनावणी झाली असून आता केवळ आदेशाची प्रतीक्षा आहे.
सदाशिव महाजन यांनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत हे प्रकरण लावून धरले आहे. ‘क्लोज फॉर आॅर्डर’ झालेल्या या प्रकरणात काय निर्णय येतो याकडे लक्ष लागले आहे. पाच वर्षांपासून महाजन यांची सहकारातील ही लढाई सुरू आहे. जिल्हा बँकेचे १४ संचालक सेवा सोसायट्यांचे थकबाकीदार असल्याने त्यांच्याकडून या रकमेची वसुली करावी व त्यांना संचालक पदावरून अपात्र करावे अशा मागणीने हा संघर्ष सुरू झाला. तत्कालीन विभागीय सहनिबंधक शामकांत झळके यांनी संचालकांविरुद्ध निकाल दिला होता. त्यावर या संचालकांनी सहकार मंत्र्यांकडून स्थगनादेश मिळविला. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात एकलपीठ, द्विसदस्यीय पीठ व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पुन्हा नागपूर उच्च न्यायालयात आले. नंतर १४ पैकी आठच संचालकांविरुद्ध प्रकरण दाखल करण्यात आले होते. तर याचिकाकर्त्या तिघांपैकी केवळ महाजन कायम राहिले. कोर्टाची ही लढाई लढताना बँकेच्या तिजोरीतून सुमारे ६० लाख रुपयांचा खर्च केला गेला.
वास्तविक संचालकांची ही प्रकरणे वैयक्तिक असल्याने त्यांनी स्वत: कोर्ट-कचेरीचा खर्च करणे अपेक्षित होते. त्यासाठी बँकेच्या तिजोरीतून उधळपट्टी करणे गैर आहे, असे नमूद करीत सदाशिव महाजन यांनी विभागीय सहनिबंधकांकडे वसुलीचे प्रकरण दाखल केले होते. मात्र तेथे संचालकांच्या बाजूने निर्णय लागला. त्याला सहकार मंत्र्यांकडे आव्हान दिले गेले. त्यावरील सुनावणी पूर्ण झाली. आता सहकार मंत्री चंद्रकांत पाटील त्यावर काय निर्णय देतात याकडे लक्ष लागले आहे. ६० लाखांच्या रकमेची या संचालकांकडून वसुली करावी ही प्रमुख मागणी आहे.
वकिलांची फी, मुंबई, नागपूर, दिल्ली प्रवास, कोर्ट फी अशा वेगवेगळ्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात आठ संचालकांनी बँकेच्या तिजोरीतून ६० लाख रुपये खर्च केले. शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असताना शेतकऱ्यांची बँक मनमाने पद्धतीने उधळपट्टी करीत आहे.
अध्यक्षांसाठी १४ लाखांची ईनोव्हा वाहनाची खरेदी, चहा-पानावर वर्षाकाठी २५ लाखांचा खर्च चर्चेत असताना आता कोर्ट-कचेरीवरील ६० लाखांच्या उधळपट्टीचे प्रकरण पुढे आल्याने बँकेच्या या संचालकांविरुद्ध शेतकरी वर्गात तीव्र असंतोष धुमसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 60 lakhs extra cash in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.