टिपेश्वर अभयारण्यात ५७ चंदन वृक्षांची तोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:31 IST2017-08-26T21:30:23+5:302017-08-26T21:31:50+5:30
तालुक्याच्या टिपेश्वर अभयारण्यातील नर्सरीतून १२ ते १५ आॅगस्टदरम्यान चंदनाच्या एक-दोन नव्हे तर तब्बल ५७ वृक्षांची अवैधरित्या कत्तल करण्यात आली आहे.

टिपेश्वर अभयारण्यात ५७ चंदन वृक्षांची तोड
नरेश मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : तालुक्याच्या टिपेश्वर अभयारण्यातील नर्सरीतून १२ ते १५ आॅगस्टदरम्यान चंदनाच्या एक-दोन नव्हे तर तब्बल ५७ वृक्षांची अवैधरित्या कत्तल करण्यात आली आहे. या वृक्षतोडीमुुळे वन्यजीव विभागातील संबंधित तमाम अधिकारी व कर्मचाºयांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
दरम्यान, या चंदनवृक्षतोडप्रकरणी कारंजा (जि.वाशिम) येथील रमजू शिकारी नंदावाले (५५) आणि रहेमान गारवे (३३) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांचे तीन साथीदार वन अधिकाºयांना चकमा देवून फरार होण्यात यशस्वी झाले. टिपेश्वर अभयारण्यातील सुन्ना बीटमध्ये कंपार्टमेंट क्र.१०० अंतर्गत पिलखान नर्सरी परिसरात चंदनाच्या परिपक्व झाडांची ही तोड करण्यात आली. सागवान, चंदन तस्करांची ही मोठी टोळी आहे. सहा वर्षांपूर्वी ती या अभयारण्यात येऊन गेली होती. तेव्हापासून त्यांना या चंदनाचे लोकेशन होते. १२ आॅगस्टला ते या जंगलात येऊन गेले. परंतु त्या दिवशी वन अधिकारी गस्तीवर असल्याने ते १३ ला आले. नंतर पुन्हा १५ ला आले. त्यांनी १२ आॅगस्टला १५ व १५ आॅगस्टला ३५ अशा ५० चंदन वृक्षांची तोड केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात हा आकडा ५७ पेक्षा अधिक आहे. १५ आॅगस्टला गस्तीदरम्यान या टोळीतील दोघे पकडल्या गेले. मात्र तिघे फरार होण्यात यशस्वी झाले. अटकेतील दोघांची चार दिवस वनकोठडी घेवून नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यांनी अत्याधुनिक मशीनद्वारे या चंदनवृक्षांची तोड केली असावी, असा संशय आहे. या वृक्षतोडीमुळे वन्यजीव विभागात खळबळ निर्माण झाली आहे.
मारेगाव, पैनगंगा अभयारण्यातही प्रचंड वृक्षतोड
मारेगावमधील बीट क्र.१०९, ११० व ११५ मध्ये गेल्या काही दिवसात मोठ्या गोलाईच्या सुमारे २००-२५० सागवानवृक्षांची तोड करण्यात आल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यामध्ये उमरखेड, खरबी, बिटरगाव वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवान तोड व तस्करी सुरू आहे. सागवान व चंदन वृक्षतोडीमुळे पांढरकवडा वन्यजीव विभागातील अधिकाºयांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
‘वन्यजीव’चे नियंत्रण चक्क नागपुरातून !
वन्यजीव विभागाचे मुख्यालय नागपुरात आहे. ऋषिकेश रंजन हे या विभागाचे मुख्य वनसंरक्षक आहे. नागपुरातून टिपेश्वरचा कारभार हाकला जातो. पांढरकवडा येथे वन्यजीव विभागाला बी.पी. राठोड उपवनसंरक्षक आहे. येथील सहायक वनसंरक्षक बोराडे यांची बदली झाल्यापासून ही जागा रिक्त आहे. चंदनवृक्षतोड झालेले क्षेत्र टिपेश्वरचे आरएफओ अमर सिडाम यांच्या कार्यक्षेत्रात येते. टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्याचे नियंत्रण नागपूरऐवजी अमरावतीमधून व्हावे, अशी अनेक दिवसांची मागणी आहे. नागपुरातील नियंत्रणामुुळे येथील वन्यजीव यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. त्यामुळे कुणाचाच पायपोस कुणाच्या पायात नसतो. पर्यायाने तस्कर सक्रीय होऊन वनसंपत्तीचा ºहास होतो. चंदन व सागवान तोडीच्या या प्रकरणात वन्यजीव अधिकारी-कर्मचाºयांचा हलगर्जीपणा दिसत असला तरी प्रत्यक्षात तस्करांशी मिलीभगत तर नाही ना, हे शोधण्याचे आव्हान ऋषिकेश रंजन यांच्यापुढे आहे.
रात्रगस्तीमुळे चंदन वृक्ष तस्कर टोळीतील दोघांना पकडण्यात यश आले. अन्य तिघे फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
- बी.पी. राठोड
उपवनसंरक्षक (वन्यजीव), पांढरकवडा