शिधापत्रिकेतील ५६ हजार नावे रद्द
By Admin | Updated: October 9, 2016 00:17 IST2016-10-09T00:17:19+5:302016-10-09T00:17:19+5:30
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार दूर करण्यासाठी पुरवठा विभागाने राबविलेल्या एक्झासिस्टींग राशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीमने (ईआरसीएमएस) जिल्ह्यातील ५६ हजार नावे राशन कार्डातून रद्द झाली आहे.

शिधापत्रिकेतील ५६ हजार नावे रद्द
आधारने बिंग फोडले : ‘ईआरसीएमएस’चा पहिला टप्पा
यवतमाळ : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार दूर करण्यासाठी पुरवठा विभागाने राबविलेल्या एक्झासिस्टींग राशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीमने (ईआरसीएमएस) जिल्ह्यातील ५६ हजार नावे राशन कार्डातून रद्द झाली आहे. आधार क्रमांक यासाठी सक्तीचा करण्यात आल्याने हे बिंग फुटले आहे. यामुळे जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानातील गैरप्रकाराला आळा बसणार आहे.
जिल्ह्यात रास्त भाव धान्य दुकानाच्या संदर्भात प्रशासनाकडे विविध तक्रारी येत होत्या. अधिक धान्य उचलूनही कमी धान्य वितरित केले जात असल्याची ओरड सातत्याने होती. अनेकदा राशन मात्र काळ्याबाजारात विकला जात होता. वेगवेगळ्या राशन कार्डावर एकाच व्यक्तीचे नाव आढळून येत होते. हा प्रकार थांबविण्यासाठी तीन वर्षांपासून ईआरसीएमएसच्या माध्यमातून काम सुरू करण्यात आले. राशन दुकानदारांचे डी-१ रजिस्टर क्रॉस चेक करण्यात आले. या मोहिमेचा पहिला टप्पा गत आठवड्यात संपला. त्यात अनेक गंभीर बाबी पुढे आल्या. एकाच व्यक्तीचे नाव वेगवेगळ्या राशन कार्डावर असणे, गाव सोडून गेलेल्या व्यक्ती, मृत व्यक्ती आणि लग्न झालेल्या मुलींचीही नावे राशन कार्डावर आढळून आली.
ईआरसीएमएसमुळे हे बिंग फुटले असून त्यासाठी आधार क्रमांकाची मदत घेण्यात आली. त्यामुळे एकाच व्यक्तीची दोनदा असलेली नोंद रद्द करण्यात आली. जिल्ह््यात असे ५६ हजार नावे पुढे आले आहे. हे बिंग फुटल्याने आता राशन दुकानदारांना नवीन कोटा सुधारित नावानुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)
राशनकार्ड आॅनलाईन
ईआरसीएमएस प्रक्रियेतून राशन कार्डाची आॅनलाईन नोंद करण्यात आली. त्यानंतर नावे वगळण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात राज्याच्या पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये ही नावे टाकली जाणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात पाच लाख ६९ हजार शिधापत्रिका आहे. यात एक लाख १४ हजार २९२ अंत्योदय, दोन लाख ८८ हजार ३६३, प्राधान्य गटातील आणि ८८ हजार ३५९ एपीएल शिधापत्रिका आहे. जिल्ह्यात चार हजार ६९६ अन्नपूर्णा शिधापत्रिका असून ११ हजार २३० शुभ्र शिधापत्रिका आहे.
पुरवठा विभागातील कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी आरसी डिलशनची प्रक्रिया नुकतीच पार पाडली. यातून ५६ हजार व्यक्तींची नावे वगळण्यात आली आहे.
- शालीग्राम भराडी,
जिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ